सेवा संकल्प अभियानांतर्गत १४२ बालकांची २डी-इको तपासणी 

0
2

– संशयित हृदयरोगाचे निदान निश्चितीसाठी दोन दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन

गडचिरोली :- “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांमध्ये संशयित हृदयरोगाचे निदान निश्चित करण्यासाठी दोन दिवसीय २डी-इको तपासणी शिबिराचे आयोजन दि. २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी DEIC, जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे करण्यात आले.

सदर शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, गडचिरोली; जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या शिबिरासाठी डॉ. भूषण चव्हाण, बाल हृदयरोग तज्ज्ञ, अपोलो हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी तज्ज्ञ सेवा देत बालकांची २डी-इको तपासणी केली.

शिबिराच्या पहिल्या दिवशी ८२ तर दुसऱ्या दिवशी ६०, अशा एकूण १४२ बालकांची तपासणी करण्यात आली.

सदर शिबिरासाठी जिल्ह्यातील RBSK पथकांमार्फत प्राथमिक तपासणीमध्ये संशयित हृदयरोग आढळलेल्या बालके/विद्यार्थ्यांना, तसेच SNCU मधील नवजात बालके व इतर ठिकाणांहून संदर्भित बालकांना तपासणीसाठी आणण्यात आले.२डी-इको तपासणीद्वारे निदान निश्चित झालेल्या पात्र बालकांच्या पुढील उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक तृतीयस्तरीय संदर्भ सेवा व पुढील उपचारांचे नियोजन DEIC, गडचिरोलीमार्फत लवकरच करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील संशयित हृदयरोग असलेल्या बालकांना वेळेत तज्ज्ञ तपासणी, अचूक निदान तसेच पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक संदर्भ सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.