– डॉ. सुहासिनी वंजारी यांना जीवनगौरव पुरस्कार; शिक्षकांच्या कार्याचा गौरव सोहळा उत्साहात
नागपूर :- औदुंबर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून नागपूरसह विदर्भातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३० उत्कृष्ट शिक्षकांचा ‘गुरुरत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. नुकताच रविवारी १३ सप्टेंबर रोजी, डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विकास ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सर्वपल्ली राधाकृष्णन, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ येथील विद्यार्थ्यांनी कॅप्टन विजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या सैनिकी मानवंदनेने झाली. रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. सुवतीदेवी झुनझुनवाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर करून उपस्थितांची दाद मिळवली, तर स्व.प्रकाश उमाटे शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सन्मानार्थ पथनाट्य सादर केले. डॉ. सुहासिनी वंजारी यांना जीवनगौरव कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या सत्रात शिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्त्व डॉ. सुहासिनी गोविंदराव वंजारी यांना आमदार विकास ठाकरे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. यावेळी निधी वन चे संचालक मनोज कुंभारे आणि वेद चे संचालक चंद्रप्रकाश चतुर्वेदी यांनी शिक्षकांच्या सन्मानासाठी आयोजित या उपक्रमाला सामाजिक भावनेतून सहकार्य केल्याचे सांगितले. ‘विशेष गुणरत्न’पुरस्कारानेही गौरव शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात क्रियाशील राहून परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या मान्यवरांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. मंदा उमाठे, डॉ. प्रज्ञा देशपांडे, डॉ.वंदना बडवाईक, मेधा नवसाळकर, अमेय एदलाबादकर, कविता पवार, शालिनी तेलरांधे, डॉ. शारदा रोशनखेडे, प्राचार्य सुभाष खाकसे, डॉ.पितांबर उरकुडे, डॉ.शुभ्र रॉय, कॅप्टन विजय नाईक, लक्ष्मी मोझरकर, संजय पुंड, आरती भोसले, डॉ.शारदा मंडवगडे आणि श्रीवंत शेंडे यांना प्रशस्तीपत्र, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन ‘विशेष गुणरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ३० शिक्षकांना ‘गुरुरत्न’ पुरस्कार कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात माजी आमदार सुधाकर कोहळे, मानव विकास संस्थेचे अध्यक्ष राजा जोध, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अजय अग्रवाल, प्राचार्य उदय टेकाडे, उपशिक्षण अधिकारी रमेश हरडे, गौतम गेडाम, हरीश अरोरा, शरद देशमुख आणि अनिल अहिरकर यांच्या हस्ते नागपूर व विदर्भातील ३० उत्कृष्ट शिक्षकांना ‘विशेष गुरुरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कारार्थी शिक्षकांना प्रशस्तीपत्र, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याची दखल घेण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तावना आयोजिका भाग्यश्री पवार यांनी तर संचालन आर.जे.मोना यांनी केले, तर शालिनी तेलरांधे यांनी आभार मानले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने शिक्षक, त्यांचे कुटुंबीय, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या उपक्रमामुळे कार्यक्रमाला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





