spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सेवा संकल्प अभियानातून आदिवासी नागरिकांच्या समस्या व प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्याला गती – प्रकल्प अधिकारी शिवांश सिंह

– एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी येथे ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ

– आरोग्य तपासणी, रांगोळी प्रदर्शन, वृक्षारोपणासह सामूहिक वनहक्क आराखड्यांवर कार्यवाही

गडचिरोली :- आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा, त्यांच्या कार्यालयीन समस्या व प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा व्हावा तसेच शासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान व्हावे, या उद्देशाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या महिनाभर चालणाऱ्या अभियानाचा शुभारंभ सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी शिवांश सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल, अहेरी येथे काल करण्यात आला.

‘सेवा संकल्प अभियान’ १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासी नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांशी संबंधित विविध शासकीय सेवा, योजना तसेच कार्यालयीन स्तरावरील प्रलंबित प्रकरणांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या प्राचार्या पारधी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती आणि क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी शिवांश सिंह यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी उपलब्ध शैक्षणिक संधींचा पुरेपूर उपयोग करून आपली क्षमता विकसित करावी आणि विविध क्षेत्रांत यश संपादन करावे, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीला प्राधान्य

अभियानाच्या शुभारंभानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवांश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आरोग्य तपासणीसाठी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करण्याबरोबरच आवश्यकतेनुसार पुढील उपचार व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आरोग्य शिबिरांचे महत्त्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आदिवासी संस्कृती व क्रांतिकारकांचे रांगोळीतून दर्शन

यावेळी विद्यार्थ्यांनी आदिवासी क्रांतिकारक, आदिवासी संस्कृती, परंपरा आणि जीवनशैलीवर आधारित रांगोळ्यांचे प्रदर्शन भरविले होते. शिवांश सिंह यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध रांगोळ्यांची पाहणी केली. रांगोळीच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती आणि इतिहास प्रभावीपणे मांडल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व कलागुणांचे कौतुक केले.

त्यानंतर शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे संगोपन करण्याचे महत्त्वही यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

सामूहिक वनहक्क आराखड्यांवर सविस्तर चर्चा

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत प्रशासकीय कामकाजालाही गती देण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या सभागृहात तालुका कन्व्हर्जन्स समितीची बैठक प्रकल्प अधिकारी तथा समितीचे अध्यक्ष शिवांश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

बैठकीत सामूहिक वनहक्क (Community Forest Rights – CFR) आराखड्यांच्या मंजुरीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित आराखडे, त्यांची सद्यस्थिती तसेच आवश्यक प्रशासकीय कार्यवाहीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यात आले. सामूहिक वनहक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून स्थानिक आदिवासी समुदायाच्या उपजीविकेला आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनाला चालना देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.

१७ ऑक्टोबरपर्यंत अभियान; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

‘सेवा संकल्प अभियान’ हे केवळ उद्घाटनापुरते मर्यादित न राहता १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सातत्याने राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या कालावधीत आदिवासी विकास विभागाशी संबंधित विविध सेवा व योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण तसेच प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

अहेरी प्रकल्प क्षेत्रातील आदिवासी बांधव, शेतकरी, महिला, विद्यार्थी व इतर पात्र लाभार्थ्यांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांच्या निवारणासाठी तसेच शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियान’चा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी शिवांश सिंह यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.