हंसराज, भंडारा :- जिल्हा परिषदेच्या शाळांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याऐवजी सरकार त्यांच्या शिक्षणाची ‘हत्या’ करत असल्याचा खळबळजनक आरोप भंडारा जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांनी केला आहे. जिल्ह्यातील ७९४ शाळांपैकी तब्बल ५० शाळा आजघडीला ‘बिनशिक्षक’ (शिक्षक नसलेल्या) झाल्या असून, हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले असल्याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
नरेश ईश्वरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षांपासून शिक्षकांची कमतरता भासत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १००० हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. ५० शाळांमध्ये एकही शिक्षक नसल्याने या शाळा केवळ नावापुरत्या उरल्या आहेत. “ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांनी शिकूच नये, असा सरकारचा मानस आहे का?” असा संतप्त सवाल ईश्वरकर यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचे छुपे धोरण सरकार राबवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष या गंभीर परिस्थितीवर भाष्य करताना ईश्वरकर म्हणाले की, “जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा मोठे मोठे नेते प्रचाराच्या मैदानात उतरतात, आश्वासनांची खैरात करतात. मात्र, आज जेव्हा जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तेव्हा एकही मोठा नेता यावर बोलायला तयार नाही. प्रशासनही या प्रकरणी पूर्णपणे सुस्त झाले असून, त्यांना विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही.”
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि मजुरांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतात. मात्र, शिक्षकच नसल्याने या मुलांनी कुणाकडे पाहायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही परिस्थिती कायम असूनही सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. यामुळे ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.




