Home Latest News मनपाने दोन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले मनपाची नस्ती चोरांवर आयुक्तांची कारवाई

मनपाने दोन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले मनपाची नस्ती चोरांवर आयुक्तांची कारवाई

0
118
nmc

 

नागपूर, ता. २९ : नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयातील उपअभियंता कार्यालयातून महानगरपालिकेच्या फाईल चोरण्याच्या आरोपावरून नागपूर महानगरपालिकेने दोन कंत्राटदारांवर कारवाई केली असून, त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करून त्यांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकले आहे. अनिकेत रंगारी व राजेश रंगारी अशी या दोन कंत्राटदारांची नावे आहेत.

गेल्या २५ जुलैला मनपाच्या लक्ष्मीनगर झोनमधील उपअभियंता अभिजीत नेताम यांच्या कार्यालयातून कंत्राटदार अनिकेत रंगारी व राजेश रंगारी यांनी कार्यालयीन नस्त्यांची चोरी केली. या संदर्भात उपअभियंता अभिजीत नेताम यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार या दोन्ही कंत्राटदारांवर बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत.

अनिकेत रंगारी व राजेश रंगारी या दोन्ही कंत्राटदारांच्या कृतीची गांभीर्याने दाखल घेत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या २१ ऑगस्ट २०२५ च्या आदेशान्वये या दोन्ही कंत्राटदारांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले  आहे. त्याचप्रमाणे नागपूर महानगरपालिकेच्या सर्व प्रकारच्या निविदा प्रक्रियेत सहभागी घेण्यापासून कायमस्वरुपी प्रतिबंधित करून या दोन्ही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता (प्रकल्प 1) यांनी आदेशात म्हटले आहे.