नागपूर ३० : शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीची हत्या केल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखा युनिट ४ च्या पोलिसांनी १७ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाला अवघ्या दोन तासांत ताब्यात घेतले आहे. हा तरुण पीडितेचा मित्र होता, मात्र त्यांच्यात वाद झाल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
घटनेचा तपशील:
अजनी येथील कौशल्या नगर येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीची १५ वर्षीय मुलगी आणि आरोपी तरुण यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून मैत्री होती. मात्र, काही कारणांमुळे त्यांच्यात दुरावा आला आणि पीडितेने आरोपीशी बोलणे बंद केले. याचा राग मनात धरून, २९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आरोपीने अजनी येथील गुलमोहर कॉलनीजवळ, कांबळे चौक येथे पीडितेला शाळेतून परत येत असताना थांबवले. त्याने ‘माझ्यासोबत का बोलत नाहीस?’ असे विचारत आपल्याजवळील चाकूने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला.
गंभीर जखमी झालेल्या मुलीला तात्काळ मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. फिर्यादीच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.च्या कलम १०३(१), १२६(२) आणि म.पो.का.च्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची तात्काळ कार्यवाही:
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलली. आरोपीला शोधण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या स्तरावर ८ वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. या पथकांनी गोपनीय माहितीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने मिळालेल्या माहितीवरून, आरोपीला कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समता नगर, गुरुद्वाराजवळ सापळा रचून ताब्यात घेतले.
पोलिसांनी विचारपूस केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कारवाईसाठी अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
या कामगिरीत पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव बारंगे, पोलीस उपनिरीक्षक जितेशाचारी आरवेल्ली, पोलीस हवालदार रोशन तिवारी, अजय यादव, नितीन वर्मा, अभिषेक शनीवारे, पुरुषोत्तम जगनाडे, महेंद्र करीगवार, पुरुषोत्तम काळमेघ, सुनील ठवकर, निलेश ढोने, अतुल चाटे, देवेंद्र नवघरे, नापोअं. प्रकाश राजपल्लीवार, पोअं. गोविंद देशमुख, श्रीकांत मारवाडे आणि गंगेश्वर सुवासा यांचा सहभाग होता.



