नागपूर पोलिसांची धडक कारवाई: अपहरण केलेल्या व्यक्तीची २ तासांत सुटका, ४ आरोपींना अटक

0
52

 

नागपूर ३० : कळमणा पोलिसांनी एका व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या चार आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक करून, अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली आहे. पैशांच्या वादातून हे अपहरण करण्यात आले होते.

शाहीद अली अमजद अली (३१) यांचा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी आरोपी अफजल अहमद जावेद इक्बाल आणि सय्यद अतीफ जोहर यांच्याकडून ४ लाख रुपये उधार घेतले होते. या पैशांवरून त्यांच्यात वाद सुरू होता.

२८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४:३० ते रात्री ९:३० च्या दरम्यान शाहीद अली बेले नगरमधील त्यांच्या मामाच्या दुकानात होते. यावेळी आरोपी अफजल आणि सय्यद यांनी तिथे येऊन पैशांबद्दल बोलायचे असल्याचे सांगत, शाहीद यांना जबरदस्तीने त्यांच्या ॲक्टिव्हा गाडीवर बसवले आणि शांतीनगर पुलाच्या दिशेने घेऊन गेले. तिथे त्यांचा तिसरा साथीदार कामरान नकीब अशपाक अहमद आला. शाहीद यांनी मदतीसाठी याचना केली असता, या तिघांनी त्यांना मारहाण केली.

त्यानंतर ते शाहीद यांना सय्यदच्या ‘दुल्हन’ नावाच्या कापडाच्या दुकानात घेऊन गेले. तिथे त्यांनी पुन्हा मारहाण केली. आरोपी जमाल अहमद जावेद इक्बाल याने मारहाणीचा व्हिडिओ काढून तो ‘स्नॅपचॅट’वर अपलोड केला.

या घटनेची माहिती ‘११२’ क्रमांकावर कळमणा पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी तांत्रिक तपासणीद्वारे फिर्यादीचा मोबाईल लोकेशन शोधून काढला आणि सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शाहीद अली यांची आरोपींच्या तावडीतून सुखरूप सुटका केली.

याप्रकरणी कळमणा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार कलम १३७(२), १४०(२), २९६, ११८(१), ११५(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, चार मोबाईल फोन आणि एक लाकडी बेसबॉल स्टिक असा एकूण अंदाजे २,००,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई कळमणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे, सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत मुसळे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मोरे, संजय माने, पोलीस हवालदार विलास गमे, विशाल भैसारे, पोलीस अंमलदार वसीम देसाई, ललित शेंडे, अविनाश चव्हाण आणि अजय गटलेवा यांनी पार पाडली.