नागपूर ३० : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्यावतीने नागपूर येथे नुकतीच एक आढावा सभा पार पडली. या सभेचे अध्यक्षपद माजी खासदार रामदास तडस यांनी भूषवले. समाजातील कार्यकर्त्यांमध्ये जागृती निर्माण करणे आणि संघटना अधिक मजबूत करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.
अध्यक्षीय भाषणात रामदास तडस म्हणाले, “मी संघटनेच्या ताकदीवरच दोनदा आमदार आणि दोनदा खासदार होऊ शकलो.” त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात आणि पक्षात आपले कर्तृत्व सिद्ध करावे, कारण संघटनेची ताकद त्यांच्या पाठीशी राहील. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून प्रांतिक संघटनेच्या माध्यमातून एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “एकत्र आल्याशिवाय समाजाला कोणीही विचारेल नाही,” असेही ते म्हणाले.
तडस यांनी सांगितले की, संघटनेच्या अथक प्रयत्नांमुळेच शासनाने ‘संताजी आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन केले आणि जातीय जनगणना करण्याची मागणी पूर्ण झाली. ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी समाज कटिबद्ध असून, त्यासाठी लढाई सुरू राहील. आगामी निवडणुकांमध्ये समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी राज्यभर जिल्हावार आढावा बैठका घेऊन समाजात जागृती केली जाईल.
त्यांनी ‘संताजी आर्थिक विकास मंडळा’साठी ५०० कोटी रुपयांच्या भांडवलाची मागणी शासनाकडे प्रलंबित असून, सध्या मिळालेले ५० कोटी रुपये समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे असल्याचे सांगितले. हे पुरेसे भांडवल मिळाल्यास समाजातील तरुणांना रोजगार आणि उद्योगांसाठी आर्थिक मदत करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपूरमध्ये काँग्रेसने समाजावर अन्याय केल्याचा आरोप करताना तडस म्हणाले की, “काँग्रेसने बाबा आस्टनकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान नेत्याला फक्त तेली असल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदावरून काढले.” तसेच, मागील विधानसभा निवडणुकीत एकाही सक्षम नेत्याला उमेदवारी दिली नाही, आणि शिक्षक मतदार संघात राजेंद्र झाडे यांना दिलेला शब्द पाळला नाही, असेही त्यांनी सांगितले. तरुणांनी हे सर्व ओळखले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांना मिळालेल्या महत्त्वाच्या पदांबद्दल अभिनंदन केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
या बैठकीला राज्य महासचिव डॉ. भूषण कर्डिले, राज्य कार्याध्यक्ष गजानन शेलार, राज्य कोषाध्यक्ष बळवंतराव मोरघडे, राज्य उद्योग आघाडी अध्यक्ष पोपटराव गवळी, राज्य युवा आघाडी अध्यक्ष अतुल वांदिले, कार्याध्यक्ष नंदकिशोर दंडारे, नागपूर विभाग अध्यक्ष जगदीश वैद्य, प्रवीण बावनकुळे, शिवकुमार सावरकर, किशोर भिवगडे, रमेश कारेमोरे आणि पुष्कर डांगरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.



