“फक्त मुंबईने नाही, महाराष्ट्राने तुम्हाला मुख्यमंत्री केलं आहे…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

0
60

मुंबई ३० : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पुन्हा एकदा मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलनाचा रणसंग्राम छेडला आहे. आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र जमला असून लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. समाजाची प्रमुख मागणी म्हणजे  मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करणे.

आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून सकाळी काही आंदोलकांनी बीएमसीसमोर ठिय्या धरला होता. मात्र, मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला. यावेळी जरांगे पाटील यांनी बीएमसी आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला.

मनोज जरांगे म्हणाले

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागण्या मान्य करणं आवश्यक आहे. कारण उपोषणाचा आज फक्त दुसरा दिवस असून शरीरावर परिणाम जाणवतोय. दोन दिवस प्रवास आणि आता उपोषण सुरू असल्याने प्रकृती खालावत आहे. त्यामुळे सरकारने वेळ न दवडता तातडीने निर्णय घ्यावा. मराठा समाजाला सन्मान द्या, अपमान करू नका,” असे जरांगे म्हणाले.

ते पुढे म्हणाले –

“काही मंत्री म्हणतात की एका समाजाचे आरक्षण काढून दुसऱ्याला देता येत नाही. पण आमची मागणी वेगळी आहे. आम्ही ओबीसींचं आरक्षण काढून घ्या असं म्हणत नाही. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. आमच्या नोंदी आधीपासूनच ओबीसीमध्ये आहेत. त्यामुळे आम्ही ओबीसीमध्येच आहोत. गैरसमज पसरवू नका आणि राज्य अस्थिर करण्याचं काम कोणत्याही मंत्र्यांकडून होऊ नये,” असा इशारा त्यांनी दिला.

आंदोलकांना आवाहन

“आम्हाला राजकारण करायचं नाही, पण मुख्यमंत्री राजकारण करत आहेत. आंदोलकांनी शांत राहावं, पोलिसांनी दाखवलेल्या मैदानावरच गाड्या लावाव्यात. कुठलाही गोंधळ घालू नये. आपला लढा शांततेत सुरू राहिला पाहिजे,” असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.

बीएमसीविषयी कठोर शब्द

बीएमसीसमोरच्या ठिय्यासंदर्भात जरांगे म्हणाले –
“आंदोलकांना पाणी मिळत नाही, जेवण मिळत नाही. हे नियंत्रण महापालिकेत असलेल्या प्रशासकाकडे आहे, म्हणजेच मुख्यमंत्र्यांकडे आहे. पण वेळ बदलत असते. सुट्टी देत नाही, पाणी बंद करताय, असं करून आंदोलकांना त्रास देताय. लक्षात ठेवा, आम्ही मोठमोठ्यांची जिरवली आहेत. त्यामुळे आयुक्त कोण आहेत त्यांचं नाव लिहून ठेवा,” असं जरांगे यांनी इशारा दिला.

फडणवीसांना थेट चेतावणी

“हॉटेल बंद, पाणी बंद करून आंदोलकांना वैतागवण्याचा प्रयत्न केला जातोय. भाजपातील मराठा कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं. मुख्यमंत्री गरीब आंदोलनकर्त्यांना त्रास देत आहेत. पण आता वेळ आहे  मराठा समाजाचं मन जिंका, आरक्षण द्या. मराठे तुम्हाला कधीच विसरणार नाहीत.

जर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाला, तर तो दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात वाईट ठरेल. यामुळे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनाही अडचणीत यावं लागेल. राज्य अस्थिर झाल्यास त्याला जबाबदार मुख्यमंत्री असतील. फक्त मुंबई तुमची नाही, संपूर्ण महाराष्ट्राने तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं आहे. त्यामुळे दुही निर्माण करू नका,” असा जोरदार इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.