आरोग्य अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल, लाखनी पंचायत समितीत एकमुखी ठराव

0
63

 

भंडारा  १ : भंडारा जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची आणि त्याचे तातडीने स्थानांतरण करण्याची मागणी जोर धरत आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

लाखनी तालुक्यातील मुरमाडी/तूप येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी २८ ऑगस्ट रोजी भंडारा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद सोमकुवर आणि जिल्हाधिकारी सावन कुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी त्या अधिकाऱ्याला तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणात, पंचायत समिती सदस्य दादू खोब्रागडे यांनीही कठोर भूमिका घेतली आहे. २९ ऑगस्ट रोजी झालेल्या लाखनी पंचायत समितीच्या मासिक सभेत, संबंधित अधिकाऱ्याच्या बदलीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. खोब्रागडे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर अधिकाऱ्याचे तातडीने स्थानांतरण झाले नाही, तर प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्यात येईल.

याच मागणीसाठी मुरमाडी/तूप ग्रामपंचायतीने ग्रामसभेतही संबंधित अधिकाऱ्याच्या बदलीचा ठराव मंजूर केला आहे, असे सरपंच सुषमा चुटे यांनी सांगितले. आता जिल्हा आरोग्य अधिकारी यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.