नागपूर १ : नागपूर गुन्हेशाखा युनिट क्रमांक ५ च्या पोलिसांनी वाडी परिसरातून एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून एक धारदार चाकू आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.३० ऑगस्ट २०२५ रोजी, गुन्हेशाखा युनिट ५ चे अधिकारी आणि अंमलदार वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना अवतार ढाबा, अमरावती रोड येथे एक सराईत गुन्हेगार येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अल्तमश मोहम्मद युसुफ मन्सुरी (वय २४, रा. गोंडखैरी, नागपूर) याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ एक धारदार लोखंडी चाकू सापडला. पोलिसांनी त्याच्याकडून चाकू आणि एक बिना नंबर प्लेटची होंडा शाइन दुचाकी, असा एकूण ५०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी अल्तमशची चौकशी केली असता, तो अनेक गुन्ह्यांमध्ये ‘वॉन्टेड’ असल्याचे समोर आले. त्याच्यावर सीताबर्डी पोलीस ठाण्यात दोन जबरी चोरीचे गुन्हे, गणेशपेठ पोलीस ठाण्यात एक जबरी चोरीचा गुन्हा आणि मध्य प्रदेशातील पांढुर्णा पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या अटकेमुळे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपीला पुढील कारवाईसाठी वाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गिते, उपनिरीक्षक राहुल रोटे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.



