गणेशोत्सव  व ईद निमित्त नागपूर शहर पोलिसांची कडक बंदोबस्ताची तयारी

0
150
संदीप कांबळे ,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता ३: आगामी गणेशोत्सव व ईद सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, तसेच नागरिकांचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी नागपूर शहर पोलिसांनी विशेष तयारी केली आहे.  परिमंडळ क्र  ५चे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करून तब्बल १७३ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपींवर नजर ठेवण्यात आली आहे.

बी.एन.एस.एस. कायद्यातील कलम १६३ (२) अन्वये या आरोपींना हद्दपार करण्याचे आदेश जारी करण्यात आले असून, १५ दिवसांच्या कालावधीत त्यांना संबंधित हद्दीत प्रवेश न करण्याचे आदेश दिले आहेत.

परिमंडळ ५ मधील महिला पोलीस ठाणे कोराडी, जरीपटका, कपिल नगर, यशोधरा नगर, नवीन कामठी, जुनी कामठी, खापरखेड़ा, कलमणा आणि पारडी या नऊ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई झाली आहे. यामध्ये कोराडी हद्दीतील १५, जरीपटका ३२, कपिल नगर ११, यशोधरा नगर २०, नवीन कामठी २२, जुनी कामठी ६, खापरखेड़ा १४, कलमणा ३१ आणि पारडी २२ असे मिळून एकूण १७३ आरोपींवर बंदोबस्ताच्या दृष्टीने कारवाई करण्यात आली आहे.

शहरात कोणतीही गोंधळाची किंवा अनुचित घटना घडू नये यासाठी नागपूर पोलिसांनी काटेकोर नियोजन केले असून, नागरिकांनीही शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे