संदीप कांबळे ,विशेष प्रतिनिधी
कामठी, ता. प्र. ३ – स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कामठी बस स्थानक चौकात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. नुकतीच अमली पदार्थांच्या नशेत काही टवाळखोरांनी बस स्थानक चौकात गोंधळ घातल्याची घटना घडली, जी परिसरातील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही, पण यामुळे या भागातील असुरक्षितता पुन्हा एकदा समोर आली आहे.
या भागात दुचाकी चोरी, मारामारी आणि छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे, गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कामठी बस स्थानक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी नागरिकांनी वारंवार केली आहे. मात्र, संबंधित विभाग मेट्रोच्या कामाचे कारण देत या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे आणि लवकरच या समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन देत आहे. यासंदर्भात नागरिकांच्या वतीने आशिष मेश्राम यांनी प्रशासनाला प्रश्न विचारला आहे की, “कुणाच्या जीवावर बेतणारी घटना घडल्यावरच सीसीटीव्ही कॅमेरे लावणार का?”
शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे शोपीस ठरले
नागपूर शहराचे उपनगर मानल्या जाणाऱ्या कामठी शहरात मुख्य रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे अनेक गुन्हेगारी घटना उघडकीस आल्या आहेत. तरीही, शहरातील अनेक मुख्य ठिकाणी अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. तसेच, बस स्थानक चौकातील अनेक कॅमेरे बंद अवस्थेत आहेत आणि केवळ शोपीस बनून राहिले आहेत.
या भागात प्रवाशांची, विद्यार्थ्यांची आणि व्यापाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. गेल्या काही दिवसांपूर्वी एका माथेफिरूने बस चालकाला मारहाण केली होती. या परिसरात चाकू घेऊन धमकावण्याच्या घटनाही नित्याच्या झाल्या आहेत. यापूर्वीही, या भागात आरोग्य कर्मचारी कमल बढेल, काँग्रेसचे पदाधिकारी तुषार दावानी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. तसेच, कुंदन रंगारी नावाच्या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याशिवाय, दुचाकी चोरी, लूटमार आणि किरकोळ मारामारीच्या घटनाही घडल्या आहेत.
या सर्व गंभीर परिस्थितीचा आणि आगामी निवडणुकांचा विचार करता, कामठी बस स्थानक चौकात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, पोलीस विभाग यावर कोणतीही ठोस भूमिका घेत नसल्यामुळे नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.




