spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पीडब्ल्यूडीकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी, आर्थिक विवंचनेतून कंत्राटदाराची आत्महत्या

 

नागपूर प्रतिनिधी ता ३: राज्यातील कंत्राटदारांची थकबाकी ही एक गंभीर समस्या बनली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सर्व नागरी कंत्राटदार थकबाकीची रक्कम लवकर देण्याची मागणी करत आहेत. याचदरम्यान, नागपूर शहरात सोमवारी एक दुर्दैवी घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) कंत्राटदार पी.व्ही. वर्मा, उर्फ मुन्ना वर्मा यांनी आर्थिक विवंचनेतून राजनगर येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली.

प्राथमिक चौकशीनुसार, वर्मा यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) कोट्यवधी रुपयांची थकबाकी होती, ज्यामुळे ते दीर्घकाळापासून आर्थिक संकटात होते. या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नागरी कंत्राटदारांच्या थकबाकीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्मा हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोठ्या कंत्राटदारांपैकी एक होते. नागपूर, गोंदियासह इतर जिल्ह्यांमध्येही त्यांचे काम चालत होते. तसेच, त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या हॉटमिक्स प्लांटचीही काही कामे केली होती. ते राजनगर येथील फ्लॅटमध्ये एकटे राहत होते, तर त्यांचे कुटुंब हैदराबादमध्ये असते.

वर्मा यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुमारे ३०-४० कोटी रुपयांची थकबाकी होती, ज्यामुळे ते खूप चिंतेत होते. ते सातत्याने पीडब्ल्यूडी प्रशासनाकडे रक्कम देण्याची मागणी करत होते, पण पैसे मिळत नसल्यामुळे ते आर्थिक अडचणीत सापडले होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक विवंचनेमुळे वर्मा यांनी सोमवारी सकाळी साडेसहा वाजता आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी जेव्हा त्यांचा नोकर घरी पोहोचला, तेव्हा वर्मा पंख्याला लटकलेले दिसले. नोकराने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह खाली उतरवला.

पीडब्ल्यूडी कंत्राटदाराने आत्महत्या केल्याच्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राज्यात कंत्राटदारांच्या थकबाकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच, वर्मा यांच्या कुटुंबियांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे, त्यानंतर ते नागपूरकडे निघाले आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.