फिरंगी रेस्टो अँड लाउंजमध्ये पोलिसांचा छापा, अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

0
45

 

नागपूर प्रतिनिधी ता ३: नागपूर पोलिसांनी पाचपावली परिसरातील कमल चौक येथील साईनाथ कॉम्प्लेक्सच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या फिरंगी रेस्टो अँड लाउंज अँड बँक्वेटवर रात्री उशिरा छापा टाकला. या कारवाईत अवैधपणे हुक्का पार्लर चालवणाऱ्या आणि ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पुरवणाऱ्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लकडगंज विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांना एका खबऱ्याकडून या बेकायदेशीर व्यवसायाची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, २९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता पोलीस निरीक्षक के.जे. शेडमाके, कॉन्स्टेबल गजानन गिरी, कॉन्स्टेबल रंगिता वरखाडे यांच्या पथकाने पंचांसमक्ष संबंधित रेस्टॉरंटवर छापा टाकला.

या छाप्यात, आरोपी ग्राहकांना तंबाखूयुक्त हुक्का सर्रासपणे देत असल्याचे पोलिसांना आढळून आले. काउंटरवरून विविध फ्लेवरचे तंबाखूचे पाऊच आणि हुक्का बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. पंचांच्या उपस्थितीत एकूण ५३,२२० रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आशुतोष मंगल डोगरे (वय २७), रा. सुमाश नगर, आयटी पार्क, नागपूर ,सुमित राजेश साखरे (वय २६), रा. आंबेडकर कॉलनी, लष्करीबाग,जॉन्टी शोलोमन फिलिप्स (अंदाजे वय २७), रा. मार्टिन नगर, जरीपटका (मालक),धीरज गोलचा, रा. सदर, नागपूर,रणजीत सेवकलाल कोचे (व्यवस्थापक),सचिन शंकर सोळंकी (वय २२), रा. नागेश्वर नगर, पारडी,अनिकेत राजेंद्र राऊत (वय २२), हॅमर कॅफेचा कर्मचारी, मूळ रा. भंडारा,आशिष भैयालाल भैसाने (वय ३२), रा. ख्रिश्चन कॉलनी, जरीपटका,रोशन सुखदेव जांभुळकर (वय ४४), रा. बाबा फरिद नगर, टाकळी या सर्व आरोपींविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानक अधिनियम (सुधारणा, २०१८) कलम ४, २१(५), ७, २०, तसेच भारतीय दंड विधान कलम २८० आणि २८७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पाचपावली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.