राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन
शेतकऱ्यांनी लावले रानभाज्यांचे ४९ स्टॉल
सचिन चौरसिया, रामटेक ३ :- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने स्व. घनश्याम किंमतकर सभागृह रामटेक येथे रानभाजी महोत्सवात शेतकऱ्यांच्या ४९ स्टालवरून ग्राहकांनी तब्बल ५२ हजार रुपयांच्या विविध आरोग्यदायी भाजींची खरेदी केली. महोत्सवाचे उद्घाटन कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी जयश्री उमाळे यांनी प्रास्तविकातून रानभाज्यांचे महत्त्व विषद केले. त्या निसर्गाची नाळ जुळवतात परंतु संस्कृतीचा वारसा सांगतात. अशा एका सुंदर उपक्रमासाठी येथे जमलो आहोत. असे त्या म्हणाल्या. राज्यमंत्री जयस्वाल यांनी रानभाज्याचे आहारातील महत्त्व आणि त्यांचे विविध औषधी गुणधर्म ही निसर्गाची अमूल्य देणगी आहे. आज यांत्रिकीकरणामुळे कृत्रिम अन्नपदार्थांनी मानसाचे आरोग्य बिघडविले आहे. आजारांना सामोरे जावे लागत आहे. निसर्गापासून दुरावले आहोत. तिथेच रानभाज्यामध्ये असलेले कॅल्शियम, जीवनसत्वे, खनिजे व अन्य औषधी गुणधर्म शरीर आरोग्यासाठी पोषक आहेत. स्वादिष्ट आरोग्यदायी रानभाज्यांनी आरोग्य टिकवून ठेवले आहे. म्हणूनच रानभाज्यांचे संवर्धन व त्यांचा प्रसार महत्त्वाचा आहे, असे म्हणाले.
यावेळी कृषी विभागातील विविध योजनेतून निवड झालेल्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कृषी यांत्रिकीकरण योजनेतून निवड झालेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक आत्माडॉ. अर्चना कडू यांनी पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन योजना तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेबबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राजेश दोनोडे यांनी केले. महोत्सवाला पल्लवीताई आशिष जयस्वाल, माजी जि प. सदस्य संजय झाडे, माजी पं. स. सभापती चंद्रकांत कोडवते, माजी न. प. सदस्य बिकेंद्र महाजन, राजेश किंमतकर, सुमित कोठारी, प्रकल्प संचालक आत्मा नागपूर पल्लवी तलमले उपविभागीय कृषी अधिकारी ग्रीष्मा डेहणे, कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच महिला व पुरुष शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी लावले रानभाज्यांचे ४९ स्टॉल
रानभाज्यांचे एकूण ४९ स्टॉल शेतकरी बांधव, महिला शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याकडून लावण्यात आले होते त्यामध्ये काटवल, अंबाडी, सुरन, माठ भाजी, केना, शेवगा, आवडी धावडी, गुडवेल, अडू, खापरखुटी, करवंद, तांदूळजा भाजी, धोप्याचे पाने, सुरण व सेंद्रिय भाजीपाला तसेच सेंद्रिय अन्नधान्य या सर्वांच्या समावेश होता. यावेळी ५२ हजार रुपयांची रानभाजी ग्राहकांकडून खरेदी करण्यात आले .



