Home Latest News अग्निवीर जवानाच्या हातातून भरलेली रायफल चोरीला

अग्निवीर जवानाच्या हातातून भरलेली रायफल चोरीला

0
104

मुंबईच्या नेव्ही नगर परिसरातील धक्कादायक घटना; चोरटा नौदलाच्या वेशात फरार

मुंबई ९ – नेव्ही नगर परिसरात सोमवारी घडलेल्या घटनेने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. कर्तव्यावर असलेल्या एका अग्निवीर जवानाच्या हातातून भरलेली इन्सास रायफल अज्ञात व्यक्तीने लंपास केली. विशेष म्हणजे, या रायफलमध्ये तीन मॅगझिन आणि तब्बल ४० जिवंत राऊंड्स होते. चोरटा नौदलाच्या शीघ्र कृती दलाच्या वेशात आला होता आणि रायफल ताब्यात घेऊन फरार झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने जवानाला “जेवणाची वेळ झाली” असे सांगत त्याला रिलिव्ह करण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्याच्या हातातील रायफल घेतली आणि क्षणात घटनास्थळावरून पसार झाला. काही वेळानंतर जवानाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली.

नौदल आणि पोलीसांचा तपास
या घटनेनंतर नौदल व पोलिसांनी तत्काळ परिसरात शोधमोहीम सुरू केली. कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर नौदल स्वतःचाही स्वतंत्र तपास करीत आहे.

गंभीर सुरक्षा धोक्याची शक्यता
कर्तव्यावर असलेल्या जवानाच्या हातून थेट रायफल चोरीला जाणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. त्यातही आरोपी नौदलाच्या वेशात होता, त्यामुळे ही घटना पूर्वनियोजित असल्याची शक्यता अधिक बलवत्तर होत आहे. सध्याच्या सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी या घटनेकडे अतिगंभीरतेने पाहण्यास सुरुवात केली आहे.