Home Latest News नवनियुक्त प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी कार्यपरिचय प्रशिक्षण कार्यशाळा

नवनियुक्त प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी कार्यपरिचय प्रशिक्षण कार्यशाळा

0
120

 

नागपूर, ता. ११  : नागपूर महानगरपालिका व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने नागपूर महानगरपालिकेत नवनियुक्त झालेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या कार्यपरिचय प्रशिक्षण कार्यशाळा बुधवारपासून सुरू झाली.

मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह येथे आयोजित कार्यशाळेचे बुधवारी  उद्घाटन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी.,अतिरिक्त आयुक्त विजया बनकर, मुख्य अभियंता  मनोज तालेवार, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक  जयंत पाठक, मार्गदर्शक डॉ. अविनाश मोहगावकर,  अतुल निमदेवकर, मनपाचे विधी अधिकारी प्रकाश बर्डे, सहायक विधी अधिकारी सुरज परोचे  प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मनपाच्या अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी सांगितले की, प्रशिक्षणार्थी असताना ‘प्रोव्हिजन काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो, याच काळात प्रशासकीय बारकावे शिकण्याची उत्तम संधी मिळते. पुढे चालून आपण उत्तरदायी असणार आहोत, याची काळजी घ्यावी, सर्वांनी कामाचा आनंद घेत अभ्यासावर अधिक भर द्या, आवाहन  पंत यांनी यावेळी केले.  अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी कार्यालयातील प्रत्येक व्यक्ती कडून काहीतरी शिकायला मिळते, त्यामुळे सर्वांशी सौहार्दपूर्ण वागणूक ठेवत अधिकाधिक ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन केले. अतिरिक्त आयुक्त  विजया बनकर यांनी मनपाद्वारे घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेची माहिती देत, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी कामादरम्यान येणाऱ्या अनुभवाचा आणि विवेकपूर्ण ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या अधिक सक्षम अधिकारी बनण्यासाठी करावा असे आवाहन केले.  मुख्य अभियंता  मनोज तालेवार यांनी, जन्मपासून ते मृत्यू पर्यंत मनपाचा थेट नागरिकांशी संबंध येत असल्याचे सांगत, आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत, त्याठिकाणी समर्पण वृत्तीने कार्य करण्याचा सल्ला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी  मनीष सोनी यांनी केले.

मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षात मनपाच्या सेवेत रुजू झालेल्या कनिष्ठ अभियंता, विद्युत, वृक्ष अधिकारी, कनिष्ठ अभियंता, अभि.सहायक(स्थापत्य) या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यपरिचय प्रशिक्षण कार्यशाळेत विविध मार्गदर्शकांनी प्रशिक्षणार्थी यांनी प्रोव्हिजन काळात अधिकाऱ्यांनी कसे वागावे, त्यांची कर्तव्ये काय असावे, प्रशासकीय कामकाज प्रभावीपणे कसे हाताळावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ही प्रशिक्षण कार्यशाळा येत्या १४ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.