spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

8 वा ‘राष्ट्रीय पोषण माह’ चे आयोजन

– 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम राबविणार – आयुक्त (अंगणवाडी) कैलास पगारे(भा.प्र.से.)

नवी मुंबई :- महिला व बालकांचे आरोग्य व पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने व पंतप्रधान यांच्या ‘सुपोषित भारत’ ही संकल्पना साकराण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागामार्फत दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राज्यभरातील ग्रामीण, आदिवासी व नागरी क्षेत्रातील एकूण 553 बाल विकास प्रकल्पातील एकूण 1 लाख 10 हजार 629 अंगणवाडी केंद्रांमध्ये विविध उपक्रम राबवून 8 वा ‘राष्ट्रीय पोषण माह’ साजरा करण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त(अंगणवाडी) कैलास पगारे (भा.प्र.से.) यांनी दिली.

रायगड भवन येथील महिला व बाल विकास विभागाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सन 2018 मध्ये  पंतप्रधान यांच्या ‘सुपोषित भारत’ संकल्पनेस अनुसरून एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणून राष्ट्रीय पातळीवर ‘पोषण अभियान’ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांचे आरोग्य व पोषण या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने व ‘सुपोषित भारत’ ही संकल्पना साकारण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील 25 लाख 82 हजार 330 बालके, 3 वर्षे ते 6 वर्षे वयोगटातील 24 लाख 74 हजार 417 बालके तर 4 लाख 32 हजार 234 गरोदर महिला, 1 लाख 60 हजार किशोरवयीन मुली आणि 4 लाख 23 हजार 756 स्तनदा माता या योजनेचा लाभ घेत आहेत.

राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये सन 2018 पासून माहे सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. सन 2018 ते 2020 या कालावधीत महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय पातळीवर पहिल्या तीन क्रमांकामध्ये आले तर सन 2021 ते 2023 या कालावधीत राज्याने Activities (उपक्रम) Participants (सहभागी लाभार्थी) या दोन्ही घटकामध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. सन 2023 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य द्वितीय क्रमांकावर होते, तर सन 2024 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावर होते. चालू वर्षी दि. 17 सप्टेंबर 2025 ते 16ऑक्टोबर 2025 या कालावधीत 8 वा ‘राष्ट्रीय पोषण माह’ संपूर्ण राज्यभरात साजरा होतो आहे. दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी धार, मध्यप्रदेश येथून  पंतप्रधान यांच्या हस्ते तर राज्यात यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालय, मुंबई येथे दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1.00 वा. महिला व बाल विकास विभागाचे केंद्रीय मंत्री महोदयांच्या हस्ते 8 वा ‘राष्ट्रीय पोषण माह’ या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमात ‘बाळाचे पहिले सुवर्णमयी 1000 दिवस’ या सचित्र पुस्तीकेचे प्रकाशन तसेच नव नियुक्ती मुख्यसेविका आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यभर साजरा होत असलेल्या 8 वा ‘राष्ट्रीय पोषण माह’ मध्ये केंद्र शासनाने 1. लठ्ठपणा कमी करणे 2. बालपणाची काळजी आणि शिक्षण (ECCE) / पोषण भी पढाई भी (PBPB) 3. अर्भक व बालक आहार पद्धती (IYCF) 4. पुरुष सहभाग (Men Streaming) 5. स्थानिक सक्षमीकरण व स्वावलंबन (Vocal for Local) 6. एकत्रित कृती व डिजीटायझेशन या सहा संकल्पना निश्चित करुन दिल्या आहेत.

आरोग्य विभागाच्या सहकार्याने दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातील अंगणवाडी परिक्षेत्रातील महिलांची आरोग्य तपासणी आरोग्य विभागाच्या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये करण्यात येणार आहे.

आठवा राष्ट्रीय पोषण अभियानादरम्यान थिम वर आधारित कोणकोणते उपक्रम घ्यावयाचे आहेत या बाबतचे वेळापत्रक राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी व ग्रामीण यांना देण्यात आलेले असून घेण्यात आलेले उपक्रम व या उपक्रमातील जन सहभाग यांच्या नोंदी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील जन आंदोलन डॅशबोर्ड चे लॉगिन credential उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

आठवा राष्ट्रीय पोषण माह दरम्यान केंद्रशासनाव्दारे ठरवून दिलेल्या थिमवर आधारित विषयांची माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी 5 तज्ञांच्या वेबिनारचे आयोजन करण्यात आले असून त्याचे युट्युब स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. तसेच सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवर या विषयावर आधारित मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.

अशी माहिती आयुक्त(अंगणवाडी) पगारे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाची व्यापक प्रसिध्दी व प्रचार झाल्यास राष्ट्रीय पोषण आहाराचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहचेल. ख-या अर्थाने ‘पोषण माह’ साजरा करण्यासाठी आणि समाजातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी या कार्यक्रमाची माहिती समाजातील प्रत्येक घटकांपर्यत पोहचणे आवश्यक आहे. असे आवाहन एकात्मिक बाल विकास योजनेचे आयुक्त(अंगणवाडी) कैलास पगारे (भा.प्र.से.) यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.