पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती अर्थात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत महसूल विभागामार्फत राज्यभरात ” सेवा पंधरवाडा २०२५” हा उपक्रम राबविला जाणार आहे. विशेष करून ग्रामीण विभाग आणि सामान्य जनतेच्या दृष्टीने या उपक्रमाची यशस्वीता फार महत्वाची आहे. जनतेचे प्रश्न प्रत्यक्षात सोडविले जावे, महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचा जनतेला अनुभव यावा हा यामागचा उदात्त हेतू आहे आणि तो पूर्ण व्हावा ही सर्वांचीच अपेक्षा राहील.
हा उपक्रम तीन टप्प्यात असून पहिला टप्पा १७ ते २२ सप्टेंबर या दरम्यान राबविला जाईल. हा टप्पा शेती, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या कालावधीत पांदन/ शेतरस्त्यांना क्रमांक देणे, शासनदरबारी नोंदी करने, मोजणी, सीमांकन करने, तसेच पांदन रस्त्याविषयी काही समस्या, वाद असतील तर त्यास मार्गी लावणे यासारखे विषय या कालावधी महसूल विभाग हाती घेणार आहे. त्यासाठी सर्व संबंधित शेतकरी, ग्रामपंचायत आणि शासकीय यंत्रणा यांनी सहकार्य करने अत्यंत आवश्यक आहे. अनेक दशकापासून रखडलेल्या पांदन रस्ते समस्येला वाचा फुटेल व शेतकऱ्याचे अच्छे दिन येतील. नवीन पिढीतील शेतकऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे तेव्हा मनापासून, चोख व अपेक्षित गोष्टी पदरात पडेल अशी आशा आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान सर्वांसाठी घरकुल व पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप उपक्रम राबविला जाईल. तिसरा टप्पा २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी तर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविल्या जाईल. एकंदरीत काय तर हा सेवा पंधरवाडा गोरगरीब, उपेक्षित, वंचित, समस्याग्रस्त जनतेसाठी आशेचा किरण आहे यासाठी महसूल विभागाचे अभिनंदन! परंतु हा उपक्रम एक फार्स ठरू नये, कागदावरच राहू नये, नुसता गवगवा आणि फोटोसेशन होऊ नये हीच एकमेव अपेक्षा! या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक प्रशासन, शासकीय यंत्रणा आणि सामान्य जनतेने सुद्धा प्रामाणिक, सजग, सतर्क आणि कार्यक्षम राहिले पाहिजे. या उपक्रमाचे भविष्यात दूरगामी आणि चांगले परिणाम होतील अशी आशा करतो.
– प्रा. डॉ. विलास डोईफोडे,सावनेर, जि. नागपूर



