मुंबई :- पुण्यासह ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये जड वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होत चालली आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, “रात्री १२ च्या आत जर ट्रक रस्त्यावर दिसले तर मनसे कार्यकर्ते ते फोडून टाकतील” असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे.
अलीकडेच झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री १२ नंतरच घोडबंदर रस्त्यावर जड वाहने सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश पाळले जात नसल्याचा आरोप करत जाधव यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. “सरकार आदेश देतं, पण प्रशासन पाळत नाही. दोन अधिकारी निलंबित झाले तर शिस्त लागेल” असे ते म्हणाले.
जाधव यांनी ठाण्यात वाहतुकीवरील उपाययोजना आणि जनतेच्या समस्या मांडण्यासाठी मनसेचा ट्रॅफिक मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. “हा सर्वसामान्यांचा आक्रोश आहे. आज ना उद्या ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढणारच” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सीसीटीव्ही बसवून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंड आकारला जातो, मात्र जड वाहनांवर मात्र कारवाई होत नसल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला. “नियम फक्त आम्हीच का पाळायचे? सरकार आणि प्रशासनही जबाबदार का धरले जात नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत शासनाच्या भूमिकेवर टीका केली.



