– विद्यापीठाच्या मराठी विभागात शिक्षकदिन सोहळा
नागपूर :- गुणांपलीकडील जग ओळखण्याची क्षमता शिक्षकांमुळेच येते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. संजय पळवेकर यांनी केले. विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आयोजित ‘शिक्षक दिन’ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
माननीय कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. पळवेकर यांची उपस्थिती होती. शिक्षक हे अभ्यासक्रमाच्या चौकटीबाहेर जाऊन आपल्यावर संस्कार करीत आपल्याला चांगला माणूस म्हणून घडवित असतात,असे पुढे बोलताना डॉ. पळवेकर यांनी सांगितले.

कठीण मार्ग यशापर्यंत घेऊन जात असतो. चुकांमधून आपण शिक्षत जातो. त्यामुळे, चुकांचे अवलोकन करून ती चूक पुढे होणार नाही, याचा विचार करीत स्वत:ला घडविणारा यशस्वी होतो. आयुष्याला वेळीच गांभिर्याने घ्या. ज्ञानार्जनाची प्रक्रिया निरंतर कायम राखा’, असे आवाहन ही डॉ. पळवेकर यांनी यावेळी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी शिक्षकांचा मोठेपणा हा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मोठेपणाने मोठा होत असतो, असे सांगितले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एकत्वातून त्यांचे नाते घडत असते’ असे प्रतिपादन करीत ‘सत्यशोधनाची परंपरा गुरू आणि शिष्याच्या परंपरेतून मिळाली आहे’, याकडेही त्यांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
कार्यक्रमाला विभागातील प्रा. अमृता इंदूरकर, प्रा. प्रज्ञा दुधे, प्रा. प्रज्ञा निनावे, प्रा. मनोजकुमार कोसारे, संशोधक विद्यार्थी अमित दुर्योधन, समीर कुमरे, दिनेश बांडबुचे, ऋतिका मराठे यांच्यासह एमए अभ्यासक्रमाच्या तसेच संशोधक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रदीप गावंडे यांनी केले, तर स्वागतगीत ऐश्वर्या क्षिरसागर या विद्यार्थिनीने गायले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.



