नागपूर :- दीर्घ प्रतीक्षा आणि वादानंतर अखेर मनकापुर फ्लायओव्हरचा दुसरा भाग दुरुस्ती करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. बुधवारी तो अधिकृतपणे नागरिकांसाठी सुरू करण्यात आला. नवरात्रीपूर्वी आणि अलीकडच्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा फ्लायओव्हर खुला करण्याची मागणी जोर धरत होती.
मे 2025 मध्ये झालेल्या तपासणीत फ्लायओव्हरला संरचनात्मक तडे आढळले होते. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. या काळात तीन स्पॅन बदलून पुन्हा कॉंक्रिटिंग करण्यात आले. सप्टेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.
मात्र, काम सुरू असताना सुरक्षा उपाययोजनांची कमतरता व निष्काळजीपणाचे प्रकार समोर आले. कोराडी रोड हा नागपूर शहराचा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे दररोज हजारो वाहने या मार्गावरून जातात. फ्लायओव्हरचा एक भाग बंद असल्याने एका बाजूला वाहतुकीचा ताण वाढला आणि दुसऱ्या बाजूला अपघातांची मालिका सुरू झाली.
काही दिवसांपूर्वीच फ्लायओव्हरवर शाळेची बस व व्हॅनची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात व्हॅन चालकासह नऊ मुले गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान व्हॅन चालक आणि एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
दरम्यान, नवरात्रोत्सवासाठी नागपूर व आसपासच्या जिल्ह्यांतून लाखो भाविक कोराडी येथील मां जगदंबा मंदिरात दर्शनासाठी येतात. फ्लायओव्हर बंद राहिल्यास वाहतुकीची प्रचंड समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
नागरिकांच्या सततच्या मागणीमुळे अखेर बुधवारी फ्लायओव्हरचा दुसरा भाग खुला करण्यात आला. फ्लायओव्हर पूर्णपणे कार्यान्वित झाल्यामुळे दररोज या मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.



