नागपूर :- नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादी अनिकेत सतीश डवले (वय 35, रा. कस्तुरी थ्री अपार्टमेंट, हिंगणा रोड, नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्र. 579/2025 कलम 308(2), 308(5), 352, 351(2), 3(5) भा.दं.सं. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादींच्या सतीश ट्रॅव्हल्सची इनोव्हा क्रिस्टा (क्रमांक MH31 FC5812, पांढरी) ही गाडी 7 सप्टेंबर 2025 रोजी रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया, अकोला येथे शासकीय कामासाठी पाठविण्यात आली होती. मात्र, शेगाव येथे ही गाडी सिजोंग कंपनीच्या काही लोकांनी थांबवून जबरदस्तीने ताब्यात घेतली व यार्डमध्ये ठेवली. सिजोंग कंपनीचा मालक कुणाल चव्हाण याने पैसे भरल्यानंतरही अधिक पैशांच्या लोभापोटी गाडी परत करण्यास नकार दिला. त्याचबरोबर येस बँकेचे कर्मचारी रोहित खंडेलवाल व मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी रजनीश द्विवेदी यांनीही फिर्यादीकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली. दरम्यान, फिर्यादींच्या चालकाकडून प्रथम 15 हजार रुपये घेतले गेले, त्यानंतर पुन्हा 20 हजार रुपयांची मागणी करत धमक्या देण्यात आल्या.
या गुन्ह्यातील आरोपींनी केवळ गाडी जप्त करून खंडणीची मागणी केली नाही, तर फिर्यादी व त्यांच्या चालकाला ठार मारण्याच्या धमक्याही दिल्या. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी अकोल्यात तातडीची कारवाई केली व गोदावरी इंडस्ट्री, लक्ष्मीकाटा जवळ गुन्ह्यातील इनोव्हा क्रिस्टा गाडी जप्त केली. याच ठिकाणी आरोपी प्रेमकुमार प्रितमदास लड्डानी (50, अकोला), प्रमोद रमेश नवलकर (42, शेगाव), राहुल ऊर्फ रोशन आनंदा वाकोळे (21, शेगाव) आणि केशव राजू दही (28, शेगाव) हे मिळून आले व त्यांना ताब्यात घेण्यात आले.
गुन्ह्याच्या तपासातून असेही उघड झाले की, या संपूर्ण कटात बँकेचे काही अधिकारी आणि सिजोंग कंपनीचे लोक संगनमत करून फिर्यादीकडून खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने सहभागी झाले होते. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त दाभाडे, परिमंडळ-2 चे उपायुक्त नित्यानंद झा व सहायक पोलीस आयुक्त सुनिता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि अमोल देशमुख, पोनि राहुल तसरे, सपोनि नरेंद्र तायडे, तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. तपास सदर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र तायडे करीत आहेत, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.



