जरीपटका लूट प्रकरणाचा उलगडा: व्यापाऱ्यावर गोळीबार करणारी टोळी अटकेत, पोलिसांकडून २१ लाखांचा मुद्देमाल जप्त  

0
70

नागपूर :- जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या धक्कादायक लूटप्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून, गुन्हे शाखेच्या पथकाने पंजाबसह नागपूरातील चार सराईत आरोपींना अटक करून २१ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. १० सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ७.४५ वाजता कडवी चौकाजवळील ओपल शेरेटन अपार्टमेंटसमोर धान्य व्यापारी राजीव रूपचंद दिपानी (वय ४७, रा. मेकोसाबाग, नागपूर) यांच्यावर दोन दुचाकीस्वारांनी हल्ला करून तोंडावर स्प्रे मारला, पाठीवर देशी बनावटीच्या पिस्तुलाने तीन गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी केले व त्यांच्या अॅक्टीव्हा वाहनावरून नेत असलेली ५० लाख रुपयांची रोकड असलेली एअरबॅग हिसकावून नेली. गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याची नोंद दिपानी यांच्या पत्नी श्रुती यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात केली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी यांनी घटनास्थळाला भेट दिली व गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. विशेष ७ पथके तयार करण्यात आली. तपासात जखमी दिपानी अतिदक्षता विभागात असल्याने प्राथमिक माहिती मिळविण्यास अडचण आली, मात्र त्यांच्या नातेवाईक व कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्याचा धागा पोलिसांच्या हातात लागला.

तपासात असे समोर आले की आरोपींनी व्यापाऱ्याच्या हालचालींवर पाळत ठेवून पूर्वनियोजन करून ही लूट केली होती. यासाठी राज्याबाहेरून टोळी बोलावण्यात आली होती. आरोपींनी वापरलेल्या मोटरसायकली नागपुरातच चोरी करून वाडी परिसरात सोडून दिल्या होत्या.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी सिमरजितसिंग संतासिंग संधु (४०, पंजाब), शेख हुसैन उर्फ जावेद शेख बशीर सवारे (३७, नागपूर), अब्दुल नावेद अब्दुल जावेद (३३, गणेशपेठ, नागपूर), सय्यद जिशान सय्यद रहमान (३२, जाफरनगर, नागपूर) यांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून लूट रक्कम आपसात वाटून घेतल्याचे उघड झाले.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १ देशी बनावटीचे पिस्तुल, १ जिवंत काडतुसी, २ चारचाकी वाहने, ३ दुचाकी वाहने, २ सुजुकी बर्गमन मोपेड, ५ मोबाईल फोन व ६५,००० रुपये रोकड असा एकूण २१,११,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोनि कमलाकर गड्डीमे यांच्या नेतृत्वाखाली अनिल ताकसांडे, संदीप बुआ, सपोनि नितीन चुलपार, पोउपनि नवनाथ देवकाते, मधुकर काठोके, विवेक झिंगरे, संतोष ठाकुर, रोशन तिवारी, नितीन वर्मा, अमोल जासूद, अनुप तायवाडे, मनिष रामटेके, रोहित काळे, दिपक दासरवार, जितेश रेड्डी, दिपक लाखडे, पुरुषोत्तम डेकाटे, प्रमोद देशभ्रतार, गंगेश्वर सूवासार यांनी केली.