पांढरकवडा :- २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त केळापुर येथे मोठी जत्रा भरत असते. त्यासाठी संस्थानला मोठी तयारी करावी लागत असुन, सर्व सोयीसुविधांची तयारी शेवटच्या टप्प्यात आल्याची माहिती केळापुर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे यांनी दिली. यावर्षी आई जगदंबेच्या सुवर्ण मुखवट्याचे काम पूर्ण झाल्याने लोकांना सुवर्ण मुखवट्याचे दर्शन घेता येणार आहे. विशेष म्हणजे बालोद्यानमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी नवीन खेळणे लावण्यात आले आहे. तसेच विविध जातीचे पशु व पक्षी आणण्यात आले असुन त्याची माहिती देण्याकरीता तेथे तज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ २२ सप्टेंबर रोजी संस्थानचे अध्यक्ष शंकर बडे यांच्या पांढरकवडा येथील निवासस्थानावरुन श्री जगदंबा मातेच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात येणार आहे़ ही शोभायात्रा शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत केळापूर येथील जगदंबा मंदीरात पोहचेल़ घटस्थापना झाल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येईल़ २३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता मान्यवरांचे उपस्थितीत माॅ भगवती जागरण गृप नागपूर यांच्या भजन स्पर्धेला सुरुवात होईल व २४ सप्टेंबर रोजी बाल कलाकार यांच्या सुगम संगीत चे आयोजन करण्यात आले आहे. २५ सप्टेंबर रोजी अंध व अपंग मुलांचा सेवाकुंर आर्केस्ट्रा वाशिम यांचा कार्यक्रम, २६ सप्टेंबर रोजी शुभ्रवी गृप, नटराज गृप, नृत्य भुमी कला केंद्र यांचा गरबा कार्यक्रम २७ सप्टेंबर रोजी कॉमेडी स्टार विलास झट्टे यांचा हास्य विनोद कार्यक्रम, २८ सप्टेंबर रोजी भजन स्पर्धा समारोप व बक्षीस वितरण, २९ सप्टेंबर रोजी बाल कलाकार विर केळकर यांचा भजन कार्यक्रम, ३० सप्टेंबर रोजी स्वरधारा कला संगीत संच पांढरकवडा यांचा भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हे सर्व कार्यक्रम रात्री ८ वाजता सुरु होईल़ नवरात्रात दररोज सकाळची आरती ५ वाजून ५ मिनीटांनी तर संध्याकाळची आरती ७ वाजून ५ मिनीटांनी होईल. भाविकांसाठी एस.टी.महामंडळाने बसेचची व्यवस्था केली असून सकाळी ४.३० वाजतापासून केळापूरसाठी एस.टी.बस सोडण्यात येणार आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारा नवरात्रोत्सव याही वर्षी विविध धार्मिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाने साजरा होत आहे. त्यासाठी व्यवस्थापन मंडळ तयारीला लागले आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली केळापूरची जगदंबा देवी केळापूरच्या प्रसिध्द श्री जगदंबा संस्थानात नवरात्र महोत्सवाला सोमवारपासून थाटात प्रारंभ होत आहे. नवरात्रात जगदंबामातेच्या दर्शनासाठी होणारी हजारो भाविकांची गर्दी लक्षात घेता विश्वस्त मंडळाने संपुर्ण व्यवस्था केली आहे. धार्मिक ,पौराणिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या केळापूरला विशेष महत्व आहे़ नवरात्रात नऊही दिवस या ठिकाणी नवरात्रोत्सव थाटात साजरा केला जातो़ जगदंबा मातेच्या दर्शनासाठी केवळ यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाडा व तेलंगणा या प्रदेशातील भाविक सुध्दा मोठ्या श्रध्देने केळापूरला जगदंबा मातेच्या दर्शनासाठी येतात़ केळापूर या छोट्याशा खेड्यातील जगदंबा मातेचे हे पौराणिक मंदिर परिसरातील हजारो भाविकांचे आराध्य दैवत मानले जाते़ जगदंबा मातेच्या दर्शनाने किंवा नामस्मरणाने अनेक संकटांचा नाश होऊन ईच्छीत कार्य व मनोकामना सिध्दीस जाते, अशी भक्तांची श्रध्दा आहे़



