यवतमाळ :- बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ येथे अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम (STEP – Short Term Employment Potential) अंतर्गत एक विशेष उपक्रमाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते आभासी पद्धतीने संपन्न झाले.
हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. याचा उद्देश म्हणजे राज्यातील युवकांना कमी कालावधीत उद्योग सुसंगत कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
या अंतर्गत यवतमाळमधील बाबाजी दाते आयटीआयमध्ये एकूण ०९ अल्पकालीन व्यवसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, या अभ्यासक्रमात एकूण २७० प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक अनिल पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देखील त्यांनीच केले. आभार प्रदर्शन राकेशकुमार कोडापे (सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, यवतमाळ) यांनी केले. कार्यक्रमाच्या तांत्रिक अंमलबजावणीसाठी नितीन खडसे व त्यांच्या चमूने विशेष योगदान दिले.
या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना संस्थेचे प्राचार्य. व्ही. जे. नागोरे यांनी सांगितले की, “कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने आयटीआय संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट जोडले जाण्याची संधी मिळेल. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक प्रमुख कौशल्य केंद्र म्हणून उभारण्याचा शासनाचा संकल्प नक्कीच बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.








