– फडणवीस सरकारच्या मदतीचा अर्थ कळण्याचीही राऊतांची पात्रता नाही
– भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे टीकास्त्र
मुंबई :- सत्तेत असताना शेतक-यांना दमडीचीही मदत न करणारा उबाठा गट आणि संजय राऊत हे शेतक-यांचे वैरी आहेत. देवेंद्रजींच्या नेतृत्वातील महायुती सरकारने 32 हजार कोटींची मदत अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना घोषित केली आहे. देवाभाऊंनी दिलेल्या पॅकेजचा अर्थ कळण्याची कुवत नसल्याने राऊत हे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक आहे अशी हास्यास्पद टीका करत आहेत असा टोला भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी लगावला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सत्तेत असताना शेतक-यांना दमडीचीही मदत न करणारे आज शेतक-यांच्या नावाने मगरीचे अश्रू ढाळत आहेत. पगार घेऊन सामना मध्ये काहीबाही टुकार लिहीण्याइतपतच ज्यांची वैचारिक झेप आहे त्या राऊतांनी हेक्टर आणि एकर यातील फरक काय हे गुगल वर न शोधता सांगितले तर मी राऊतांना 11 रुपयांचे बक्षिस देईन असं म्हणत बन यांनी राऊतांची खिल्ली उडवली.
छत्रपती संभाजी नगर येथे हिंदुत्वाची भूमिका रोखठोकपणे मांडणा-या बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राच्या उबाठा गटाने आज बाळासाहेबांच्या विचारांची तलवार म्यान करत खानांचे हिरवे विचार अंगिकारल्याचे चित्र आहे. ज्या प्रमाणे उबाठा गटाच्या निवडणूक प्रचारात हिरवे झेंडे फडकावण्यात आले होते त्याप्रमाणे आज संभाजी नगरमध्ये उबाठाच्या हंबरडा मोर्चाला एमआयएम सारखा पक्ष पाठिंबा देत आहे हे चित्र दुर्दैवी आहे. उद्या मतांसाठी उबाठा गट एमआयएम सोबत आघाडी करायला ही मागेपुढे पाहणार नाही असा सणसणीत टोलाही बन यांनी हाणला.
निवडणूक आयोगावर आधी शंका आता त्यांच्या भेटीला – राऊतांचा दुटप्पीपणा
सातत्याने आयोगावर शंका घेत जनतेची दिशाभूल करणारे राऊत आज निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना भेटायला जातात हा मोठा विनोदच म्हणावा लागेल या शब्दांत बन यांनी राऊतांवर निशाणा साधला. निवडणूक आयोगाला भेट देण्याची सुबुद्धी उबाठा गट, राऊतांना सुचत असेल तर त्याचे स्वागतच आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निकालानंतर निवडणूक आयोगाच्या नावाने खडे फोडण्याचे काम करू नका असा टोलाही त्यांनी लगावला. लोकशाही वाचवण्याच्या बाता मारण्यापेक्षा आधी आपला उरला सुरला पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करावे असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार मेळाव्यातील “ठाकरे ब्रँड कायम आहे ” या वक्तव्याला प्रत्युत्तर देत बन म्हणाले की प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर या दोघांनीच बेस्टच्या निवडणुकीमध्ये तुमच्या ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला आहे. ज्या बेस्ट कामगारांना देशोधडीला लावले त्यांचा अचानक पुळका आला आहे. तुमच्या उरल्यासुरल्या ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वसामान्य मुंबईकर करतील आणि देवाभाऊंच्या नेतृत्वातील महायुती सरकार निश्चितपणे विजयी होईल असा विश्वास व्यक्त बन यांनी केला.
हर्षवर्धन सपकाळ हे जनरल डायरच्या विचारांचे वारस
जनरल डायर यांनी ज्याप्रकारे भारतीयांवर अत्याचार केले त्याच पद्धतीचे अत्याचार काँग्रेसने केले होते. आणि आज इटलीची गुलामगीरी करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देवाभाऊंची जनरल डायर शी तुलना करत त्यांच्यावर विखारी टीका करतात हा विरोधाभास म्हणावा लागेल या शब्दांत बन यांनी टीका केली.








