spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपा करणार ११ प्रमुख चौकांची पुनर्रचना

– वाहतूक सुलभता व पादचारी सुरक्षेला प्राधान्य

नागपूर :- शहरातील वाढत्या वाहतुकीला सुसंगत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासह पादचारी सुरक्षेत वाढ करण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने शहरातील ११ प्रमुख चौकांचे पुनर्रचना काम हाती घेतले आहे. मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शनिवारी (ता:११) या चौकाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, राजेंद्र राठोड, उपअभियंता  राहुल देशमुख आणि कनिष्ठ अभियंता आनंद लामसोंगे उपस्थित होते.

आयुक्तांनी व्हीसीए चौक, अशोका हॉटेल चौक , लिबर्टी टॉकीज चौक ,लक्ष्मीभुवन चौक, माटे चौक, अलंकार टॉकीज चौक, विद्यापीठ लायब्ररी चौक, वंजारी नगर पाणी टाकी चौक, जाधव चौक, अग्याराम देवी चौक मध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी करीत कामाबद्दल आवश्यक निर्देश दिले. तसेच काम नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यांनी एस टी स्टँड जवळ वाहतुकीला अडथळा दूर करण्यासाठी एक बैठक घेण्याचेही निर्देश ही दिले.

वाहतुकीतील अडथळे कमी करून, चौकातील रचना सुधारून आणि सिग्नल व्यवस्थेत बदल करून वाहनांच्या हालचाली अधिक सुलभ करण्याचा या योजनेचा हेतू आहे. या चौकांमध्ये वाहतुक सुरळीत करण्यासाठी चौकांची रचना सुधारित केली जात आहे तसेच सिग्नलच्या वेळेत सुधारणा केली जाईल. चौकांची रचना करतांना वाहनांना सुलभतेने वळण घेणे तसेच चौक ओलांडताना वाहनांना व पादचाऱ्यांना कमी वेळ लागण्याच्या दृष्टीने संरचना करण्यात येत आहे. यामुळे अपघातांची शक्यता कमी होईल.

प्रवासी-मैत्रीपूर्ण चौक

या नव्या रचनेमुळे वाहतूक सुलभ होईलच, तसेच पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चौक ओलांडता येईल. यामुळे नागपूर शहरातील रस्ते अधिक “प्रवासी-मैत्रीपूर्ण” (commuter-friendly) बनतील, असा मनपाचा प्रयत्न आहे.

वाहतूक अभियंता रवींद्र बुंधाडे यांनी सांगितले की, सुरक्षित व सुरळीत वाहतुकीकरीता चौकांची रचना करण्यात येत आहे. चौकांमध्ये सुधारित सिग्नल व्यवस्था, अधिक स्पष्ट पादचारी मार्ग आणि वाहनचालकांसाठी सुरक्षित दिशा दर्शक फलक लावले जाणार आहेत.

Popular Articles