– १ जुलै २०२५ रोजी असलेल्या विधानसभा मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम २०२५ जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, अधिसूचित केलेल्या तारखेस (१ जुलै २०२५) अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली प्रारुप मतदार यादी येत्या ६ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाईल व यावर हरकती, सूचना मागविण्यात येईल. यावर हरकती व सूचना देण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर राहणार आहे. प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून येत्या २८ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने आयुक्तांना दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम २०२५ जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने निवडणूक तात्काळ घेण्याची आवश्यकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग स्वतंत्रपणे मतदार यादी तयार करीत नसून, विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येते. त्यानुसार १ जुलै २०२५ हा दिनांक अधिसूचित केला असून, या तारखेला अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करून महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी आदेशात म्हटले आहे.
प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या हरकतींवर मर्यादित प्रमाणात दुरुस्त करण्यात येणार आहे. यात लेखनिकांच्या काही चुका, दुसर्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले असल्यास, विधानसभा मतदार यादीत नावे असूनही महापालिकेच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीत नावे वगळली असल्यास अशा नावांची नोंद घेणे किंवा मृत व्यक्तींची नावे आढळल्यास किंवा त्याबाबत हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्यास त्याची नोंद करणे, या प्रकारचे बदल आयुक्तांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना मतदार यादीत बदल करता येणार आहे.
येत्या ४ डिसेंबर २०२५ रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर येत्या १० डिसेंबर २०२५ ला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम
निवडणुकीचा टप्पा टप्पा सुरू करण्याची किंवा पूर्ण करण्याची तारीख
१. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक – १ जुलै २०२५
२. प्रारूप मतदार यादी, हरकती व सूचनांसाठी प्रसिद्ध करण्याचा दिनांक – ६ नोव्हेंबर २०२५
३. प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक – १४ नोव्हेंबर २०२५
४. प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे – २८ नोव्हेंबर २०२५
५. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे – ४ डिसेंबर २०२५
६. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे – १० डिसेंबर २०२५




