कामठी :- आगामी होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीत अनेक इच्छुक पुरुषांच्या पदरी निराशा पडली आहे पण निवडणूक वाढविण्याच्या त्यांच्या महत्वकांक्षाला आरक्षणाचा खोडा येऊ शकलेला नाही मला नाही तर माझ्या बायकोला म्हणत इच्छुकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा चंग बांधून तयारीला सुरुवात केली आहे.त्यामुळे इच्छुक यंदाच्या निवडणुकीत अनेक मतदार संघात कुठे पत्नी ,कुठे कुठे आई , कुठे मुलगी तर कुठे बहिणीला निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.इच्छुक उमेदवारांना आरक्षणाने महिला आरक्षण जाहीर होऊन धोका दिला आहे त्यामुळे अचानक अनपेक्षितपने महिला आरक्षण निघाल्याने पुरुष इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे परंतु अनेकांनी मैदानातून माघार न घेता माझी लाडकी बायको उमेदवार राहील असे रणसिंग फुकुन तयारीला वेग दिला आहे.
मला निवडणूक लढविता येत नसली तरी माझ्या सौभाग्यवतीला जनतेचा भक्कम पाठिंबा आहे.अश्या भूमिकेतुन निवडणूक रिंगणात दोन हात करण्याची तयारी करीत आहेत.
गेले वर्षभर स्वतःला बॅनर वर झळकत येणारे इच्छुक उमेदवार आता आरक्षण सोडत झाल्यापासून आपल्या सौभाग्य वतीना बॅनर वर झळकवताना दिसू लागले आहेत.यामुळे या निवडणुकीत बायको माझी लाडकीचा प्रयोग रंगण्याची चिन्ह दिसून येत आहे.




