वडोदा-भूगाव सर्कलमध्ये दिग्गजांमध्ये चुरस; काँग्रेस-भाजपमध्ये ‘तिकीटयुद्धा’ची ठिणगी

0
54

कामठी :- कामठी तालुक्यातील वडोदा-भूगाव सर्कल खुल्या प्रवर्गात आल्यानंतर स्थानिक राजकारणाचा थर्मामीटर चढला आहे. काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, भाजपात तब्बल पाच दावेदार उभे राहिल्याने दोन्ही प्रमुख पक्षांत तिकिटासाठी जबरदस्त चढाओढ सुरू झाली आहे. त्यामुळे या सर्कलमध्ये रस्सीखेच, दबावतंत्र आणि बंडखोरीच्या शक्यतांनी राजकीय वातावरण तापले आहे.

पूर्वी बीडगाव-वडोदा सर्कल म्हणून ओळखला जाणारा हा भाग बीडगावला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर नव्याने २४ गावांचा वडोदा-भूगाव सर्कल म्हणून अस्तित्वात आला. गेल्या निवडणुकीत येथून काँग्रेसच्या अवंतिका लेकुरवाळे निवडून आल्या होत्या. तेव्हा हे सर्कल ओबीसी महिलांसाठी राखीव होते. मात्र, आता खुल्या प्रवर्गात समावेश झाल्याने पुरुष दावेदारांनी मैदान गाठले आहे.

तर बंडखोरीचा स्फोट ?

आरक्षणामुळे वारंवार संधी न मिळाल्याची खंत दोन्ही पक्षांतील अनेक इच्छुकांमध्ये आहे. त्यामुळे यावेळी तिकीट मिळाले नाही, तर असंतोष उफाळण्याची आणि बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही. ‘यावेळी नाही तर कधीच नाही!’ या भावनेत अनेक इच्छुकांनी मैदानात जोरदार मोर्चा उघडला आहे. परिणामी वडोदा-भूगाव सर्कल हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय रणांगण ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

काँग्रेसमध्ये ‘गट विरुद्ध गट’

काँग्रेसच्या गोटात सध्या दोन गटांत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश भोयर यांनी तालुक्याचे उपाध्यक्ष सोपान गभणे यांचे नाव पक्षाकडे पुढे केले आहे. गभणे यांच्या समर्थनार्थ वडोदा परिसरात बॅनरबाजीला उधाण आले आहे. दुसरीकडे, अनिकेत शहाणे यांनीही पक्षाकडे अधिकृतरीत्या तिकीट मागितले आहे. अशातच अवंतिका लेकुरवाळे यांना पुन्हा काँग्रेसच्या वतीने संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सर्कल खुल्या प्रवर्गात; तिकीट मिळणार कुणाला?

भाजपात पाच दिग्गज रिंगणात

विशाल चामट यांनीही तिकिटासाठी अर्ज दाखल केला आहे, परंतु सरपंच निवडणुकीतील पराभव त्यांच्या दावेदारीसाठी अडथळा ठरत असल्याचे बोलले जाते. स्थानिक व प्रभावी कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले सचिन घोडमारे, जे कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत, यांनी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने संपर्क मोहीम राबवून कार्यकर्त्यांमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे. किशोर बेले यांचे नावही चर्चेत आहे.

सर्कलचे गणित उलटेपालटे

पूर्वी बीडगाव-वडोदा सर्कल म्हणून ओळख बीडगाव नगरपंचायतीत गेल्यानंतर २४ गावांचा स्वतंत्र सर्कल

मागीलवेळी ओबीसी महिलांसाठी आरक्षित, आता खुल्या प्रवर्गात परिणामी दोन्ही पक्षांत पुरुष नेत्यांची चढाओढ सुरू

दुसऱ्या बाजूला भाजपात दावेदारांची रांगच लागली आहे. माजी सदस्य अनिल निधान हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार मानले जात असले तरी, त्यांच्या मूळ सर्कलला महिला आरक्षण लागल्याने त्यांनी वडोदा सर्कलकडे मोर्चा वळवला आहे. मात्र, त्यांना ‘बाहेरचे उमेदवार’ अशी टीका स्थानिक स्तरावर सहन करावी लागत आहे. याच सर्कलमधून दोन वेळा पराभूत झालेल्या उमेदवाराचे पती रमेश चिटके यांनीही पुन्हा एकदा उमेदवारीची मागणी केली आहे, परंतु दोनवेळा संधी दिली, अशी चर्चा त्यांच्या विरोधात सुरू आहे.

पाच उमेदवार, एकच तिकीट

अनिल निधान यांना ‘बाहेरचे’ ठरवणारे स्थानिक कार्यकर्ते सावध

रमेश चिटके आणि विशाल चामट यांच्यावर विरोधकांची काटेकोर मोहीम

सचिन घोडमारे यांचा ‘ग्राउंड कनेक्ट’ वाढत असून किशोर बेले यांचे नावही चर्चेत

निर्णयाला उशीर झाल्यास बंडखोरीचा स्फोट होण्याची शक्यता

तालुक्यातील भुगाव येथे ग्रामपंचायतने शेतकरी, शेतमजूर, गावकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून वैशाली गान फाउंडेशनला तीस वर्षासाठी जमीन लीजवर दिली असून ती जमीन परत घेण्याचा करार सुद्धा झाला असताना नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवारे यांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बिन बुडाचे तथ्यहीन आरोप करून भाजप पक्ष व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बदनाम करून खोटी प्रसिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचे वर न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे कामठी पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण वंजारी यांनी सांगितले.

वैशाली गान फाउंडेशन सामाजिक संस्था ही केंद्र सरकारच्या अमृत ग्राम योजने अंतर्गत संपूर्ण देशात भुगाव गावाची निवड झाली असून या गावात गेल्या दहा वर्षापासून अमृत ग्राम प्रकल्पा अंतर्गत महत्त्वाचे कार्य असून कृषी उत्पादन क्षमतेत वाढ,आरोग्य सेवा, समुदायिक विकास प्रकल्प, सामुदायिक आर्थिक लाभ, पर्यावरण, सामाजिक उन्नती, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा, सांडपाणी प्रकल्प, सेंद्रिय शेती, कृषी, शेतकऱ्यांसाठी सौर शीतगृह, शुद्ध पिण्याचे पाणी, विविध प्रकारचे सामाजिक उपक्रमाअंतर्गत, शेतकरी, शेतमजूर व गावकऱ्यांसाठी राबविण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने पटवारी हलका क्रमांक २८ मधील शासकीय जमीन तीस वर्षाच्या लीज वर देण्यात आली असून त्यानंतर ती जमीन शासनाला परत करण्याचा करार सुद्धा झाला आहे. शासकीय जमिनीचा कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसताना नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे यांनी भुगाव परिसरात गेल्या पाच वर्षाच्या काळात कोणत्याही प्रकारचे विकास कामे न केल्यामुळे त्यांचा जनतेत जनाधार शून्य झाल्यामुळे खोटी प्रसिद्धी प्राप्त करण्यासाठी बिन बुडाचे तथ्यहीन आरोप लावून भाजप पदाधिकारी व पालकमंत्री यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांचे वर न्यायालयात अब्रू नुकसान भरपाईचा दावा करणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

वडोदा जिल्हा परिषद क्षेत्र

वडोदा सर्कल : वडोदा, केसोरी, अंबाडी, भामेवाडा, आसलवाडा, जाखेगाव, चिकना, बोरगाव, नान्हा, मांगली, रानमांगली, भुगाव, निन्हाई रिठी, वरंभा,झरप, नेरला, चिखली, निंबा, शिवनी, आडका, टेमसना, परसोडी, कुसुंबी, खेडी, पांढरकवडा, तरोडी बु.

पंचायत समिती गण : ०२ : वडोदा व भूगाव 

१) ग्रामपंचायतीची संख्या : १४

२) एकूण गावे : २६

३) एकूण लोकसंख्या : २४१६४

४) अनुसूचित जाती : ३५३०

५) अनुसूचित जमाती : ७३१

पंचायत समिती गण : ०२ : वडोदा व भूगाव 

१. वडोदा पं.स. गणात सामाविष्ट गाव : वडोदा, केसोरी, अंबाडी, भामेवाडा,आसलवाडा, जाखेगाव, चिकना, बोरगाव, नान्हा, मांगली, रानमांगली

२. भूगाव पं.स. गणात सामाविष्ट गाव : भुगाव, निन्हाई रिठी, वरंभा,झरप, नेरला, चिखली, निंबा, शिवनी, आडका, टेमसना, परसोडी, कुसुंबी, खेडी, पांढरकवडा, तरोडी बु. या गावांचा समावेश आहे.