spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्याकरिता मनपाचा पुढाकार

– मनपा लवकरच सुरू करणार ‘बाल वाचनालय’

नागपूर :- लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारा लवकरच बाल वाचनालय सुरू केले जाणार आहे. मनपाच्या अर्थसंकल्पात याकरिता 5.21 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले असून, नुकतेच बाजीराव साखरे ई- ग्रंथालय परिसरात लहान मुलाकरिता बाल वाचनालय तयार करण्याकरिता निविदा प्रकाशित करण्यात आली आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशनानुसार, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या उपायुक्त तथा ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. रंजना लाडे यांच्या देखरेखीखाली लष्करीबाग येथील बाजीराव साखरे ई-ग्रंथालयाच्या परिसरात बाल वाचनालय उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना हवी ती पुस्तके वाचायला मिळावी, वाचन संस्कृती रुजावी, त्याची चळवळ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. हे बाल वाचनालय 8 ते 16 या वर्ष वयोगटातील म्हणजे वर्ग 3 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता वरदान ठरणार आहे. जवळपास 8 हजार चौरस फूट परिसरात तयार करण्यात येत असलेली इमारत जी प्लस वन अशी असणार आहे. गट चर्चेसाठी ठिकाण, पुस्तकांची कपाटे, टेबल व्यवस्था, खिडकीजवळची पुस्तकांची कपाट, खिडकीजवळील वाचन कक्ष, कमी उंचीची पुस्तकांची कपाटे व कॅन्टीन, लॉकर रुम व इतर सुविधायुक्त आकर्षक असे बाल वाचनालय तयार करण्यात येणार आहे. माजी मंत्री व आमदार डॉ. नितीन राऊत यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन रुची वाढविण्यासाठी बाजीराव साखरे ग्रंथालय परिसरात बाल वाचनालय तयार करण्यात यावे अशा सूचना केली होती. सध्याच्या मोबाईल काळात लहान मुलांमध्ये वाचनाची सवय लावणे गरजेचे आहे, त्याचबरोबर त्यांची विचारशक्ती वाढविण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊनच मनपातर्फे पहिले बाल वाचनलय सुरू करण्यात येत आहे.

Popular Articles