खापा :- मॉयल लिमिटेड, गुमगाव खाण, खापाच्या वतीने खाण पर्यावरण आणि खनिज संवर्धन सप्ताह २०२५- २६ दि. २१ नोव्हेंबर शुक्रवारला साजरा करण्यात आला. या निमित्ताने सप्ताह अंतर्गत (MEMC) एम ई एम सी निरीक्षण संपन्न झाले. खाण कामांमध्ये पर्यावरण संतुलन राखणे, खनिजांचा शाश्वत आणि जबाबदार वापर सुनिश्चित करणे, कर्मचारी आणि स्थानिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करणे. हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एम. के. सोनी (टीम संयोजक) (वरिष्ठ व्यवस्थापक खाण, RCCPL प्रा. लि.), राहुल गराडे (वरिष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ, MSMC लि.), मनोज मोंधे (सहाय्यक महाव्यवस्थापक (खाण), मॉयल लि.) उपस्थित होते. उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गुमगाव खान प्रबंधक उमेश चरपे यांच्या हस्ते करण्यात आले.

सप्ताह निमित्त खाण परिसरातील प्रदूषण नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, हरित आवरण स्थितीचे मूल्यांकन, पर्यावरण तपासणी करण्यात आली. कार्यक्षम खनिज वापर आणि कचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष देऊन खनिज संवर्धन उपाय योजना, तसेच कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्यात आली.
यानिमित्ताने मॉयल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पर्यावरण संरक्षण मोहीममे अंतर्गत स्थानिक जवाहर हायस्कूल, खापाच्या विद्यार्थ्यांद्वारे पथनाट्य सादर करण्यात आले. पर्यावरण संरक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांद्वारे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गोदरेज फीडबैक फाऊंडेशन चैरिटेबल ट्रस्टचे प्रोजेक्ट मैनेजर जितेंद्र पासवान व कर्मचारी यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

या प्रसंगी बोलताना, गुमगाव खान प्रबंधक उमेश चरपे यांनी खनिज संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास साधत विकासाच्या दिशेने मॉयल अग्रेसर राहील हे प्रमुख लक्ष ठेवले.यावेळी मॉयलचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, गुमगाव मायलचे अधिकारी व सर्व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.








