spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्री क्षेत्र महाकाली संस्थान येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑनलाईन उपस्थिती

यवतमाळ :-  महाराष्ट्रात प्रथमच कृष्णशिला या दगडापासून निर्मित, दशभुजा तसेच अभयमुद्रा व वरदहस्तमुद्रेत विराजमान असलेल्या महाकाली मातेच्या भव्य व दिव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

कासोळा देव येथे श्री महाकाली संस्थान, महर्षी मातंग ऋषी आश्रम येथे भक्तिभावात पूर्ण झाला. या ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण प्राणप्रतिष्ठा सोहळा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या सोहळ्यात ऑनलाइन सहभागी होऊन भाविकांशी संवाद साधला.

सद्गुरु गजानंद माऊलींच्या तपश्चर्येने ही भूमी पावन झाली आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन पर्यटन विकासासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात येथे एक उत्तम वन पर्यटन केंद्र विकसित होऊन इतर धार्मिक स्थळांप्रमाणे हे तीर्थस्थळ नावारूपाला येणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे सदभाग्य लाभले. महाकाली मातेच्या दर्शनाने समाजात सद्भावना, शांतता व समृद्धी नांदो, अशी सदिच्छा पालकमंत्री राठोड यांनी यावेळी व्यक्त केली.

महाकाली मातेच्या दर्शनाने भाविकांना समृद्धी लाभते तसेच सकल मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा असून, या सोहळ्यासाठी परिसरातील तसेच जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

कार्यक्रमास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार बाबुसिंग महाराज, आमदार किसनराव वानखडे, आमदार सई डहाके, शितल संजय राठोड, माजी आमदार नामदेव ससाने, ययाती नाईक यांची उपस्थिती होती.

सोहळ्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते महाकाली मातेची पूजा झाली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य व ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन प. पू. समर्थ सद्गुरु श्री गजानंद माऊली भक्त परिवार यांच्यावतीने करण्यात आले होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.