spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर मनपा निवडणूक: ‘कमळ’ नको, ‘धनुष्यबाण’च हवा! शिंदे सेनेचा भाजपला दणका; ६६ जागांसाठी 136 उमेदवार सज्ज

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून, महायुतीमधील जागावाटप आणि चिन्हाचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी शिंदे सेनेचे उमेदवार भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर लढू शकतात असे संकेत दिले होते. मात्र, या दाव्याला छेद देत शिंदे सेनेचे महानगर प्रमुख भारत गुप्ता यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आम्ही भाजपच्या चिन्हावर नाही, तर बाळासाहेबांच्या ‘शिवसेना’ (धनुष्यबाण) चिन्हावरच ही निवडणूक लढवू,” असे गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे.

काय होती चर्चा?

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि शिंदे सेनेचे विदर्भ प्रमुख किरण पांडव यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर, भाजपच्या गोटातून अशा बातम्या समोर आल्या की, महायुतीचा भाग म्हणून शिंदे सेनेचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार स्थानिक नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचेही जोरगेवार यांनी सूचित केले होते. भाजपच्या ६६ प्रभागांसाठी ४५० हून अधिक उमेदवारांची गर्दी झाल्याने, मित्रपक्षाला सामावून घेण्यासाठी ‘कमळ’ चिन्हाचा पर्याय पुढे करण्यात आला होता.

शिंदे सेनेचा यू-टर्न आणि भारत गुप्तांचा खुलासा..

मात्र, शिंदे सेनेचे महानगर प्रमुख भारत गुप्ता यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, शिंदे सेना ही कोणाच्याही चिन्हावर निवडणूक लढवणार नसून, आपल्या हक्काच्या आणि स्वाभिमानाच्या चिन्हावरच मैदानात उतरणार आहे.

गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, “शिंदे सेनेकडे सध्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६६ प्रभागांसाठी तब्बल 136 खंबीर उमेदवार निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहेत.” त्यामुळे पक्षाला दुसऱ्याच्या चिन्हाची गरज नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि तयारी पाहता, पक्ष स्वबळावर आणि स्वतःच्या ओळखीवर लढण्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

चर्चा झाली, पण समाधान नाही!

आमदार जोरगेवार आणि किरण पांडव यांच्यात बैठक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देतानाच, भारत गुप्ता यांनी त्या बैठकीतील वास्तवावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, “जोरगेवार आणि पांडव यांच्यात प्राथमिक चर्चा नक्कीच झाली, परंतु या चर्चेत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही किंवा जागावाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघालेला नाही.”

त्यामुळे जोपर्यंत सन्मानजनक जागावाटप होत नाही आणि पक्षाच्या भूमिकेचा आदर केला जात नाही, तोपर्यंत केवळ चर्चांना अर्थ नाही, असेही त्यांनी सुचवले आहे.

महायुतीत ठिणगी पडणार?

एकीकडे भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे, तर दुसरीकडे शिंदे सेनेनेही 136उमेदवारांची यादी तयार ठेवून शक्तीप्रदर्शन केले आहे. भाजपला वाटत होते की मित्रपक्षाला आपल्या चिन्हावर लढवून जागांचे गणित जुळवता येईल, पण शिंदे सेनेने स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थित करत ‘कमळ’ हातात घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

त्यामुळे आगामी काळात चंद्रपूर महानगरपालिकेत महायुतीमध्ये ‘मैत्रीपूर्ण लढत’ होणार की जागावाटपाचा तिढा सुटणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तूर्तास तरी भारत गुप्तांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या रणनीतीला मोठा धक्का बसला आहे, हे निश्चित.

Popular Articles