नागपुरातील राजकीय पक्षांची संयुक्त समिती सक्रिय, १८ ऑगस्टला निवडणूक आयोगाची भेट
नागपूर १५ : नागपूर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या तयारीत असतानाच, शहरात आता बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. नागपूरमधील काँग्रेससह विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत या मागणीसाठी संयुक्त समितीची स्थापना केली आहे. या समितीमार्फत १८ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन मनपा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घ्याव्यात, अशी औपचारिक मागणी करण्यात येणार आहे.
ईव्हीएमवर शंका, बॅलेट पेपरवर भर
शहरातील प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कुणाल राऊत यांनी ही माहिती दिली. राऊत म्हणाले,“जगातील अनेक प्रगत देश आजही निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेतात. भारतात मात्र ईव्हीएमवर वारंवार संशय घेतला जात आहे. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम संदर्भात अनेक गंभीर आरोप झाले. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील एकसंध विचारधारेचे राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.राऊत यांनी सांगितले की या समितीत काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (BSP) आणि इतर समान विचारधारेचे पक्ष सहभागी झाले आहेत. या सर्वांचा उद्देश एकच — निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह करणे.
“नागरिकांचा विश्वास बॅलेट पेपरवर अधिक आहे. म्हणूनच आम्ही हे अभियान राबवतो आहोत,” असे ते म्हणाले.
१८ ऑगस्टला आयोगासमोर मागणी सादर होणार
या समितीचे प्रतिनिधी १८ ऑगस्ट रोजी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन बॅलेट पेपरद्वारे मतदानाची अधिकृत मागणी करणार आहेत. राऊत यांनी पुढे सांगितले की,
“जर ही मागणी मान्य झाली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन सुरू करू.”
स्वाक्षरी मोहीम आणि जनजागृती उपक्रम राबवणार
राऊत यांनी सांगितले की या मोहिमेअंतर्गत शहरात विविध जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यामध्ये स्वाक्षरी मोहिम, मतदार जनजागृती अभियान तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ प्रचार केला जाणार आहे.




