– मे.ब्लॅक संसुई वेट मशीनचे प्रोप्रायटर अभिषेक गुंपलवार यांच्यावर शासन व ग्राहकांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप
नागपूर :- नागपूर विभागात बेकायदेशीर वजन काट्यांद्वारे सर्वसामान्य नागरिकांची तसेच शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात वैधमापन शास्त्र विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत मे. ब्लॅक संसुई वेट मशीनचे प्रोप्रायटर अभिषेक गुंपलवार यांचे नाव थेट नमूद करण्यात आले असून, त्यांच्यावर गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत.
तक्रारीनुसार, अभिषेक गुंपलवार यांच्या मालकीच्या मे. ब्लॅक संसुई वेट मशीन कंपनी मार्फत नियमबाह्य व अवैध वजन काट्यांचे उत्पादन व विक्री दुरुस्ती करण्यात येत आहे. हे वजन काटे वैधमापन शास्त्र कायदा 2009 व नियम 2011 चे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या वजन काट्यांच्या पडताळणी (Verification) व मुद्रांकन (Stamping) शुल्काची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा न करता ती परस्पर लाटण्यात आल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे एकीकडे शासनाची आर्थिक फसवणूक झाली असून, दुसरीकडे चुकीच्या वजन काट्यांमुळे ग्राहकांची थेट लूट व फसवणूक होत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. हा प्रकार केवळ प्रशासकीय निष्काळजीपणाचा नसून, आर्थिक घोटाळा व संगनमताचा संशय निर्माण करणारा असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीत पुढे असा आरोप करण्यात आला आहे की, या गंभीर गैरप्रकाराकडे वैधमापन शास्त्र विभागातील काही अधिकारी व निरीक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, दोषींवर कारवाई न करता त्यांना अप्रत्यक्ष संरक्षण दिले जात आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारदारांनी मागणी केली आहे की, मे. ब्लॅक संसुई वेट मशीनचे प्रोप्रायटर अभिषेक गुंपलवार यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून बेकायदेशीर वजन काटे जप्त करण्यात यावेत, पडताळणी व मुद्रांकन शुल्काच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, संबंधित परवाने रद्द करावेत तसेच शासनाच्या तिजोरीत झालेल्या नुकसानीची वसुली करण्यात यावी.
दरम्यान, या प्रकरणामुळे वैधमापन शास्त्र विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन या गंभीर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात काय ठोस पावले उचलते याकडे नागपूर विभागासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे




