गडचिरोली :- केवळ शेतीवर अवलंबून न राहता, शासकीय योजनेचा लाभ घेऊन शेतीपूरक व्यवसाय केल्यास आर्थिक प्रगती साधता येते, हे मौजा माळदा येथील प्रगतशील शेतकरी कृष्णा भागरथी भुरकुरीया यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ‘प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन’ (PMFME) योजनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा मसाले प्रक्रिया युनिट सुरू केला असून, आज त्यांचा परिवार या व्यवसायातून सन्मानाने उदरनिर्वाह करत आहे.
भुरकुरीया यांच्याकडे केवळ २.०० हेक्टर वडिलोपार्जित शेती आहे. मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर करणे कठीण जात असल्याने ते पर्यायी रोजगाराच्या शोधात होते. सन २०२२-२३ मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कार्यरत कृषी सहाय्यक पी. जी. मेश्राम यांनी गावात सभा घेऊन PMFME योजनेची माहिती दिली. या सभेतील मार्गदर्शनामुळे प्रोत्साहित होऊन कृष्णा भुरकुरीया यांनी मसाले प्रक्रिया उद्योग उभारण्याचे निश्चित केले. शेतीसोबत काहीतरी शेतीपूरक जोडधंदा असावा, या गरजेतून त्यांचा स्वावलंबनाकडे प्रवास सुरू झाला.
सन 2022-23 मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने गावात आयोजित बैठकीत कृषि सहाय्यक पी. जी. मेश्राम यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नती (PMFME) योजनेबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणेने भुरकुरीया यांनी मसाला प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.कृषी सहाय्यकांनी त्यांना तांत्रिक माहिती देऊन जिल्हा संसाधन व्यक्तीशी (DRP) भेट घडवून दिली. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या प्रकल्पासाठी कर्ज मंजूर केले. एकूण ९०,००० रुपयांच्या या प्रकल्पात त्यांनी स्वतःचे ८,००० रुपये गुंतवले आहेत. फेब्रुवारी २०२३ पासून त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली असुन या युनिटमध्ये सध्या मिरची पावडर, विविध प्रकारचे मसाले, पीठ (आटा) आणि डाळी तयार केल्या जातात. तयार उत्पादनांची विक्री माळदा गाव आणि जवळील धानोरा येथील बाजारपेठेत केली जाते. या व्यवसायातून त्यांना वार्षिक साधारण ४०,००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत असून, कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
“या योजनेमुळे माझा आत्मविश्वास वाढला असून माझे राहणीमान उंचावले आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता इतर शेतकऱ्यांनीही अशा योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग सुरू करावेत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे,” असे आवाहन कृष्णा भुरकुरीया यांनी यावेळी केले आहे. त्यांच्या या यशामध्ये कृषी विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
“जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी मूल्यवर्धनावर भर द्यावा. कृष्णा भुरकुरीया यांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. इतर तरुण शेतकऱ्यांनीही PMFME योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे प्रक्रिया युनिट उभारावे, यासाठी जिल्हा कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे.”
– प्रिती हिरळकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली




