खापा :- खापा पोलीस ठाणे हद्दीत फार्म हाऊसमध्ये पार्टीदरम्यान तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. १५ नोव्हेंबरच्या रात्रीची घटना १६ नोव्हेंबरला सकाळी उघडकीस आली. नातेवाईकांनी घटनेची तक्रार पोलिसांत दिली. मात्र पोलिसांनी उत्तरीय तपासणी अहवाल मिळाल्यावर २४ डिसेंबरला गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आदित्य मोहिते असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, आदित्य मोहितेचा मित्र जुवेलसिंग याने १५ नोव्हेंबरला सायंकाळी पाटणसावंगी जवळील वेलतूर शिवारात एन. जे. फार्म हाऊस येथे बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. आदित्य हा मित्र तुषार पुरोहित याच्यासोबत पार्टीला गेला होता. पार्टी दरम्यान आदित्यची प्रकृती अचानक बिघडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आदित्य बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळला व जवळपास १५ मिनिटे फार्म हाऊसच्या लॉनमध्ये पडून होता. मित्रांनी उपचाराची व्यवस्था टाळून त्याला चादरीत गुंडाळून एका खोलीत ठेवल्याचे फुटेजमध्ये दिसते. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाला असता तर, आदित्यचा जीव वाचू शकता असता. असा दावा करीत नातेवाईकांनी आदित्यचा मृत्यूला उपस्थित सर्वांची बेजबाबदारी व निष्काळजीपणाला जबाबदार धरले आहे.
पोलिस सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि इतर पुराव्यांची तपासणी आणि पार्टीत सहभागी सर्वांची चौकशी करीत आहेत. उत्तरीय तपासणी अहवालावरून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने फार्म हाऊस पार्ट्यांबाबत सुरक्षितता आणि व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न निर्माण केले आहे.
मृतक आदित्यचा मित्र तुषार पुरोहित याने आदित्यचा भाऊ परिक्षित याला १६ नोव्हेंबरला सकाळी फोनवरून आदित्य उठत नसल्याचे सांगितले. दरम्यान तिथे उपस्थित असलेला डॉ. पंकज निकास याला बोलाविण्यात आले. डॉ. निकास यांनी तपासून पल्स चालत नसल्याचे तुषार याला सांगितले. त्याने आदित्यचा भाऊ परिक्षित याला फोनवरून सांगितले. भाऊ परिक्षित यांनी कोराडी रोडवरील खासगी रुग्णालयात आणण्यास सांगितले. रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले.








