भंडारा डी मार्टचा भोंगळ कारभार: चक्क ‘भविष्यातील’ तारखेचे बिस्किट पुडे विक्रीला; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ?

0
85

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- नेहमीच स्वस्त दरांच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या डी मार्टमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भंडारा येथील डी मार्टमध्ये चक्क भविष्यातील उत्पादन तारीख (Manufacturing Date) असलेले बिस्किट पुडे विकले जात असल्याचे उघडकीस आले असून, यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका सजग ग्राहकाने भंडारा डी मार्टमधून ‘सुंदर सुपर कोकोनट बिस्किट’चा (Sundar Super Coconut Biscuit) १ किलोचा पुडा खरेदी केला. या पाकिटावरील तारखा पाहिल्यानंतर ग्राहकाला मोठा धक्का बसला. या पाकिटावर उत्पादन तारीख (MFG Date) चक्क २० डिसेंबर २०२६ अशी छापली आहे. विशेष म्हणजे आज जानेवारी २०२६ सुरू असताना, अजून यायला ११ महिने बाकी असलेल्या तारखेचे उत्पादन बाजारात विकले जात आहे.

उत्पादन व्हायच्या आधीच ‘एक्सपायरी’?

या पाकिटावरील गोंधळ इथेच थांबत नाही. उत्पादन तारीख २० डिसेंबर २०२६ असताना, त्यावर ‘Use By’ (वापरण्याची अंतिम तारीख) मात्र १९ सप्टेंबर २०२६ अशी देण्यात आली आहे. म्हणजेच तांत्रिकदृष्ट्या, हे उत्पादन तयार होण्यापूर्वीच कालबाह्य (Expire) झाले आहे, असा याचा अर्थ होतो.

मोठ्या शहरांपासून जिल्ह्याच्या ठिकाणी ‘डी मार्ट’ने आपला मोठा दबदबा निर्माण केला आहे. ‘चांगली क्वालिटी आणि कमी किंमत’ या विश्वासापोटी हजारो लोक दररोज येथे खरेदीसाठी गर्दी करतात. मात्र, अशा प्रकारे प्रिंटिंग मिस्टेकच्या नावाखाली भविष्यातील तारखा असलेले जुने उत्पादन ग्राहकांच्या माथी मारले जात असेल, तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष?

खाद्यपदार्थांच्या बाबतीत अशा प्रकारचा हलगर्जीपणा ग्राहकांसाठी जीवघेणा ठरू शकतो. प्रिंटिंगमध्ये चूक झाली असली तरी, असे उत्पादन काउंटरपर्यंत पोहोचलेच कसे? मॉलच्या गुणवत्ता तपासणी विभागाने याकडे दुर्लक्ष का केले? अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अशा प्रकरणांची दखल घेऊन भंडारा डी मार्टची चौकशी करावी आणि संबंधित कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता ग्राहकांमधून होत आहे.

मोठ्या मॉलमध्ये खरेदी करताना केवळ सवलतींकडे न पाहता, पाकिटावरील मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट नीट तपासून घ्यावी, असे आवाहन सजग नागरिकांनी केले आहे.