हंसराज प्रतिनिधी,भंडारा वरठी :- प्राण्यांना क्रूरतेने वागवून त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर वरठी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत १६ जनावरांची सुटका करण्यात आली असून, दोन वाहनांसह एकूण १३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे (स्थागुशा) पोलीस हवादार तुमाने व त्यांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत दोन वाहने थांबवून त्यांची तपासणी करण्यात आली.
आरोपीं
• पुनम दामोधर कोडापे (वय २६, रा. डोंगरदेव, ता. मोहाडी, जि. भंडारा) – महिंद्रा बोलेरो पिकअप चालक.
• सचिन जयदेव कुकडे (वय २२, रा. पालोरा, ता. मोहाडी, जि. भंडारा) – टाटा एस चालक.
तपासणी दरम्यान असे दिसून आले की, आरोपींनी आपल्या ताब्यातील टाटा एस (MH 30 AB 1856) आणि महिंद्रा बोलेरो पिकअप (MH 36 F 3779) या वाहनांमध्ये एकूण १६ नग म्हैस (वगार) व रेडे जातीची जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबली होती. जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती आणि त्यांना आखूड दोराने बांधून इजा पोहोचेल अशा स्थितीत ठेवण्यात आले होते.
जप्त केलेला मुद्देमाल:
• महिंद्रा बोलेरो पिकअप (MH 36 F 3779): किंमत ७,००,००० रुपये.
• टाटा एस (MH 30 AB 1856): किंमत ५,००,००० रुपये.
•. जनावरे: १ म्हैस (१०,००० रु.) व ८ रेडे (६४,००० रु.) – बोलेरो मधील.
•. जनावरे: ४ म्हशी (४०,००० रु.) व ३ रेडे (२४,००० रु.) – टाटा एस मधील.
एकूण मुद्देमाल: १३,३८,००० रुपये.
याप्रकरणी फिर्यादी पोहवा. तुमाने यांच्या तक्रारीवरून वरठी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अप. क्र. ०१/२०२६, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (घ) (ड) (च) (ज) (झ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा तुमाने व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. घटनेचा पुढील तपास वरठी पोलीस करीत आहेत.








