spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आणखी एक ‘पाकिस्तान’?

‘आमचे धोरण बांगलादेशकेंद्री असेल. दिल्ली आणि रावळपिंडी धार्जिणे नसेल’ ही खालेदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांची घोषणा या दृष्टीने लक्षवेधी ठरते…

बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांचा मृत्यू ही त्या देशाच्याच नव्हे, तर भारत-बांगलादेश संबंधांच्या इतिहासातही महत्त्वाची घटना ठरते. बेगम खालेदा या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी हा त्यांचा पक्ष तब्बल दीड दशकानंतर पुन्हा एकदा सत्तासमीप आला ही काही प्रमाणात त्यांच्याच कर्तृत्वाची पुण्याई. या दीड दशकात त्यांच्या प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या शेख हसीना सध्या भारतात दडून बसल्या आहेत. त्यांचा पक्ष अवामी लीग, ज्यास फेब्रुवारीत होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सहभागाची परवानगी तेथील हंगामी सरकारने नाकारलेली. त्यामुळे जवळपास निर्नायकी अशा या पक्षाला तसेही फारसे भविष्य नाही. बांगलादेशवासीयांना जवळपास दोन दशकांहून अधिक काळ याच दोघींच्या ‘बॅटल ऑफ बेगम्स’ची सवय अंगवळणी पडली होती. या काळात बांगलादेशात लोकशाही व्यवस्था सातत्याने अमलात होती हे महत्त्वाचे. ती सर्वस्वी दोषमुक्त नव्हती. तरीदेखील दोन पाकिस्तानपैकी ‘या’ पाकिस्तानने लोकशाही व्यवस्था राबवण्यात अधिक परिपक्वपणा दाखवला हे अमान्य करता येणार नाही. आता मात्र दोन बेगमांच्या अनुपस्थितीत तेथे जी राजकीय आणि व्यवस्थात्मक पोकळी निर्माण झाली, तिच्यात सध्या तरी आ-वासलेला अंधारच दिसतो. या पोकळीचा गैरफायदा घेण्यासाठी, कित्येक वर्षे सुप्तपणे वावरणारे इस्लामवादी तेथे व्यक्त होऊ लागले. त्यांना अर्थातच पाकिस्तानचा पाठिंबा आहे. पाकिस्तानला चीनचा टेकू आहे. आणि सध्या बांगलादेशात भारतमित्र शेख हसीनाविरोधी म्हणजे काही प्रमाणात भारतविरोधी लाट आहे. ही परिस्थिती भारताच्या दोन प्रमुख शत्रूंसाठी कधी नव्हे इतकी अनुकूल ठरते हे सांगण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारण विश्लेषकांचीही गरज नाही. मुद्दा असा आहे, की आता आपण काय करणार

खालेदा झिया यांच्या दफनविधीनिमित्त परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर ढाक्याला गेले होते. खालेदा मृत्युशय्येवर होत्या त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. बांगलादेशातील नवीन राजकीय वास्तवाशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने ही सुरुवात म्हणता येईल. तिचे सावध स्वागतच. खालेदा झिया यांचा बीएनपी आणि शेख हसीना यांचा अवामी लीग या दोन पक्षांच्या जातकुळीत काहीसा फरक आहे. दोन्ही पक्ष बांगलादेशाचे सार्वभौमत्व, स्वायत्तता व स्वावलंबित्वाविषयी आग्रही असतात. पण अवामी लीग अधिक धर्मनिरपेक्ष आणि बांगला अस्मिताकेंद्री आहे. याउलट बांगला अस्मितेला महत्त्व देताना बीएनपीने इस्लामवादाचा पूर्णपणे त्याग केला नाही. बांगलादेशाची निर्मिती पंजाबी उर्दू वर्चस्ववादाला झुगारून बांगला अस्मितेला केंद्रस्थानी ठेवून झाली, याविषयीची मूळ जाण दोन्ही पक्षांमध्ये लोपलेली नाही. पण बांगलादेश हा ‘इस्लामी’ देश असून तो ‘हिंदू’ भारताचा विरोधकच असला पाहिजे ही जाणीव तीव्र होण्यात काही प्रमाणात बीएनपीचाही वाटा आहे. अवामी लीग भारतमित्र होऊ लागल्यानंतर, त्या पक्षाचे एक धोरण म्हणून भारतमैत्रीला विरोध करणाऱ्यांची संख्या बीएनपीमध्ये वाढत गेली. खुद्द खालेदा झियाही त्यास कारणीभूत होत्या. याचा अचूक फायदा जमातसारख्या संघटनांनी उठवला. याच काळात कोविड आणि युक्रेन युद्धातून उद्भवलेल्या परिस्थितीने बांगलादेशी अर्थव्यवस्थेला प्राणांतिक टोले दिले. बेरोजगारांच्या झुंडी रस्त्यावर आल्या. सरकार काही करत नाही, धर्माला महत्त्व देत नाही, ‘वेगळ्या’ धर्माच्या देशाशी मैत्री करते… हे यांच्यातील बहुतांच्या डोक्यात भिनवायला धर्मवादी संघटना टपलेल्या होत्याच. दुसरीकडे सत्तेचा कैफ चढलेल्या हसीना बेगमही झपाट्याने बदलणारी परिस्थिती जोखू शकल्या नाहीत. विरोधक, विचारवंत व विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवून परिस्थिती आटोक्यात येईल, या भ्रमात राहिल्या नि फसल्या.

या दोलायमान राजकीय स्थितीचा फायदा जमाते इस्लामीसारख्या संघटना घेत असतात. जमात हा राजकीय पक्ष असला तरी अनेक धर्मवादी संघटनांशी या पक्षाची नाळ घट्ट जुळलेली आहे. मुळात या संघटनेचा किंवा पक्षाचा बांगलादेश निर्मितीलाच विरोध होता. कालौघात या गटाचे पाकिस्तानधार्जिणेपण अधिक घट्ट होत गेले. पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशची घसरण धार्मिक लष्करशाहीकडे होऊ शकली नाही, हे जमातचे प्रमुख दुखणे. पण प्राप्त राजकीय परिस्थितीत ही संघटना मुख्य प्रवाहात येऊ पाहात आहे. जमातने जवळपास सात पक्षांना हाताशी धरून आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीत विद्यार्थीबहुल नॅशनल सिटीझन पार्टीचाही (एनसीपी) समावेश आहे. जुलै २०२४मध्ये हसीना सरकारविरुद्ध आंदोलन तीव्र करण्यात या पक्षाचे योगदान मोठे होते. पण या पक्षामागे खरी ताकद जमाते इस्लामीचीच असल्याचा संशय आहे. जमातला हाताशी धरून व सरकारविरोधी विद्यार्थीरोषाचे हत्यार वापरून पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेने हसीना सरकार पाडले असा संशय व्यक्त केला जातो. त्यात काही प्रमाणात तथ्य आहे. जमातसारख्या इस्लामवादी पक्षाबरोबर जाण्यावरून एनसीपीत मध्यंतरी उभी फूट पडली. बीएनपीमधील एक गटही जमातशी आघाडी करावी या विचाराचा आहे. त्यामुळे निवडणूक झालीच, तर आगामी सरकारात या पाकिस्तानधार्जिण्या जमातचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग निश्चित दिसतो.

या परिस्थितीत खालेदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान यांचे बांगलादेशच्या राजकारणातील संभाव्य पुनरागमन महत्त्वाचे ठरते. त्यांनी परतल्यानंतर विशाल जनसमुदायाला उद्देशून केलेले पहिले भाषण भारत-बांगलादेश संबंध पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने आशावादी ठरते. ‘आमचे धोरण बांगलादेशकेंद्री असेल. दिल्ली आणि रावळपिंडीधार्जिणे नसेल’ ही त्यांची घोषणा लक्षवेधी ठरते. बांगलादेशात कायदा व सुव्यवस्था पुनर्स्थापित करण्यास प्राधान्य द्यावे लागेल हे शब्दही आश्वासक. पण तूर्त अराजकसदृश परिस्थिती निर्माण करण्यात पाकिस्तानच्या पाठिंब्यावर जमाते इस्लामीने मुसंडी मारलेली दिसते. एरवी हिंदूंना ठेचून मारणे, वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आगी लावणे, असले प्रकार बांगलादेशात होते ना. असले प्रकार नाकबूल असल्याची ग्वाही रहमान देतात.

उद्या रहमान यांनी हसीनांच्या प्रत्यार्पणाविषयी भारताकडे विचारणा केल्यास उत्तर काय द्यायचे, हे भारताला ठरवावे लागेल. एखाद्या परदेशी शासकाच्या नादी किती लागायचे, याचे भान आपण ठेवत नाही; त्यातून बांगलादेशासारखी परिस्थिती उद्भवते. हसीनांचे प्रत्यार्पण हा बांगलादेशात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकीतील प्रमुख राजकीय मुद्दा ठरू शकतो. भारतमित्र अवामी लीगला या निवडणुकीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. उर्वरित पक्षांत बीएनपी वा जमाते इस्लामीसारख्या पक्षांची आघाडी असे दोनच पर्याय आहेत. पैकी कोणता निवडावा लागेल, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. राजनयाच्या क्षेत्रात संवेदनशील स्थितप्रज्ञता पाळावी लागते. तरच आपलाही आब बाकीच्यांकडून राखला जातो. त्या दिशेने वाटचाल करताना एक पाऊल वाकडेच पडले हे सखेद नमूद करावे लागते. एका बांगलादेशी क्रिकेटपटूला भारत सरकार व बीसीसीआयच्या दबावामुळे आयपीएलमधून करारमुक्त केले गेले. त्यावर प्रतिसाद म्हणून बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाने आगामी टी-ट्वेण्टी विश्वचषक स्पर्धेत भारतात खेळायचे नाही असे ठरवले. तो निर्णयही तेथील सरकारचाच. हे असले रुसवे-फुगवे टाळावे लागतील. एके काळी ज्या पक्षाला आपल्या सरकारने फारशी किंमत दिली नाही, त्याच पक्षाबरोबर जुळवून घेण्याची वेळ येणे हे परदेशी नेत्यांमध्येही डावे-उजवे करण्याच्या वायफळ खोडीतून सामोरे येणारे अंतिम सत्य. त्यातून फेरआखणीच्या न संपणाऱ्या फेऱ्यात आपण अडकून बसतो. हे होऊ द्यायचे नसेल, तर बांगलादेशाबाबत जबाबदार, स्थितप्रज्ञ आणि व्यावहारिक अलिप्त धोरण राबवण्याची सवय आतापासूनच करून घ्यावी लागेल. बांगलादेशाकडे पाकिस्तानच्या नजरेतून पाहू नका, हे भाजपचे सध्या लाडके शशी थरूर यांचे मत जरूर लक्षात घेण्यासारखे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास आणखी एका मित्राचे रूपांतर शत्रूत करण्याचे श्रेय आपल्या सत्ताधीशांच्या खात्यात जमा होऊ शकते.

Popular Articles