– राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बिकेंद्र महाजन यांनी स्विकारला नगराध्यक्ष पदाचा कार्यभार
– दहा प्रभागातील नगरसेवकांचाही पदग्रहण सोहळा
रामटेक :- नगर परिषद रामटेकच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय प्राप्त केल्यानंतर सोमवार (दि.५) जानेवारी रोजी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांचेसह दहा प्रभागातील नगरसेवकांनी पदभार सांभाळला. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांचेसह पारशिवनी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सुनिता प्रकाश डोमकी ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. दरम्यान शहरातील प्रख्यात अठराभुजा गणेश मंदिरातुन पुजा-अर्चना करून नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी पदभार स्वीकारण्यासाठी नगर परिषदेकडे आगेकुच केली.
नगर परिषद रामटेक येथे पदग्रहण सोहळ्याचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. नगर परिषदेची इमारत पुष्पांनी आकर्षकरित्या सजविण्यात आलेली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते होते. पदभार ग्रहण सोहळ्यानंतर सत्कार समारंभ झाला. यात अध्यक्षस्थानी राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे होते प्रास्ताविक नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी केले. त्यात त्यांनी लोकशाही ला साजेसं असं व्यासपिठ निवडून आलेले असुन प्रशासक कार्यकाळात आम्हाला लोकांपर्यंत तेवढं पोहोचता आले नव्हते परंतु आता ते काम सहजतेने होईल. प्रशासक व लोकप्रतिनिधी हे दोन चाकं महत्वाची असल्याचेही मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले. नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी आपल्या भाषणात ‘विरोधकांनी विकास कामात अडथळे आणण्यापेक्षा सोबत राहून काम करावे. असा टोला विरोधकाला लावला. असे सांगत मी सर्वसामान्य कुटुंबातील असुन नगराध्यक्ष बनण्यामागचे संपूर्ण श्रेय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना दिले. तथा मी येथे बोलण्यापेक्षा येणाऱ्या पाच वर्षात काम करून दाखवेल व रामटेक चा पाच वर्षात विकास करून दाखवेल असे ते म्हणाले. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आपल्या भाषणात ही निवडणुक महत्वाची आणि आगळी वेगळी होती, प्रत्येक विकासकाम बारकाईने लक्ष देऊन दर्जेदार कसे होईल याचा विचार करावा तसेच कामाच्या गुणवत्तेमध्ये सर्वांनी मिळून काम करावे, शहरात लोकांकडुन झालेले अतिक्रमण फार मोठी अडचण आहे, ते तसेच राहिल्यास शहर विद्रूप दिसेल असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. यानंतर कार्यक्रमादरम्यान घरकुल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र सुद्धा वाटप करण्यात आले. संचालन शिक्षक प्रकाश उके यांनी केले. यावेळी नगरसेवक सुमित कोठारी, विश्वास पाटील, रोशन चाफले, पंकज लिल्हारे, सुरेखा माकडे, दीक्षा शेंदरे, भूमिका सहारे, पद्मा अंबादे, अभिषेक डहारे, अंशुल देशमुख, माणिक ताकोत, शालिनी महाजन, शितल गजभिये, विनिता आष्टणकर, पार्वती उईके, आलोक मानकर, प्रभाकर खेडकर, रजत गजभिये, कविता मुलमुले, लक्ष्मी अहिरकर सह शेकडो नागरिक उपस्थित होते.




