spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पवनी वनविभागाचा मोठा दणका; गुडेगाव जंगलात अवैध मुरुम उपसा करणारी पोकलॅन्डसह ३ टिप्पर जप्त

पवणी :- पवनी प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गुडेगाव संरक्षित वनक्षेत्रात पोकलॅन्डच्या साहाय्याने अवैध गौण खनिज (मुरुम) उपसा करणाऱ्या टोळीवर वनविभागाने आज मंगळवारी सकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत एक पोकलॅन्ड मशीन आणि तीन टिप्पर असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवनी वनपरिक्षेत्रातील सावरला सहवनक्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक आय. एच. काटेखाये आणि गुडेगावचे बिटरक्षक जी. एन. नागरगोजे हे आज सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गुडेगाव बिटातील कक्ष क्रमांक २३८ मध्ये गस्तीवर होते. यावेळी त्यांना संरक्षित वनक्षेत्रात पोकलॅन्ड मशीनद्वारे मुरुमाचे अवैध खोदकाम करून ट्रकद्वारे वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

या घटनेची माहिती मिळताच भंडारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक योगेन्द्र सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली पवनीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि. के. नागदेवे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. वनविभागाने तात्काळ कारवाई करत घटनास्थळावरून एक पोकलॅन्ड मशीन आणि तीन टिप्पर जप्त केले. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २, ३३(१) व ५२ अन्वये वनगुन्हा (प्रसुरी क्र. ०३८२७/०१/२०२६) नोंदवण्यात आला असून वाहने जप्त करण्यात आली आहेत.

पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि. के. नागदेवे करीत आहेत.

वनक्षेत्रात किंवा वनालगत अवैध खोदकाम, अतिक्रमण, अवैध वृक्षतोड किंवा शिकारीसारखे प्रकार घडत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या वनविभागाशी संपर्क साधावा किंवा ‘फॉरेस्ट हेल्पलाईन क्रमांक १९२६’ वर माहिती द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि. के. नागदेवे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.