नागपूर :- राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांची निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक होण्यासाठी प्रत्येक महानगरपालिकेसाठी राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चावरे यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांना सहाय्य करण्यासाठी एक अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या निवडणूक निरीक्षकाची नियुक्त करण्यात आली आहे. त्याअंतर्गत नागपूर महानगरपालिकेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून चंद्रपूर जिल्हा चिमूरचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. संतोष थिटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांशी निवडणूक प्रक्रियेबद्दल चर्चा केली असून निवडणूक निर्भय, मुक्त, व पारदर्शक होण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. त्यांनी निगराणी पथकाबद्दल देखील माहिती जाणून घेतली. त्यांचे मुख्य निवडणूक निरीक्षक कार्यालय रवी भवन येथील कॉटेज क्रमांक २१ येथे स्थापित करण्यात आले आहे.








