– डॉ. पुष्पांजली आप्पाजी कुंभार एम.ए.,एम. एड. , पीएच. डी.
नवी मुंबई :- दि. 28 डिसेंबर 2025 रोजी नेरूळ येथील फ्रुटवालाकल्चरल सेंटर (मराठा हॅाल) येथे प्रसिद्ध वक्ते अरूण म्हात्रे यांच्या शुभहस्ते कवयित्री डॉ.पुष्पांजली आ.कुंभार यांच्या पहिल्या वहिल्या “प्रेमांकुर”काव्यसंग्रहाचे शानदार प्रकाशन झाले .
सुनील उंब्रजकर, पुणे, यांच्या वेदांतश्री प्रकाशनाद्वारे अतिशय आकर्षक मुखपृष्ठ व प्रत्येक कवितेवर शोभेसे रेखाचित्र रेखांटन करून आकर्षक अशी छपाई करण्यात आली आहे . प्रमुख पाहुण्या कवयित्री व प्रसिद्ध निवेदिका साधना जोशी होत्या.
शिस्तबद्ध,आटोपशीर पद्धतीने समोरच्या श्रोत्यांना सतत जागृत व हसतमुख ठेवणाराहा कार्यक्रम फार देखणा होता. अरूण म्हात्रे प्रकाशना नंतर बोलताना म्हणाले- “कवयित्री पुष्पांजली यांनी हिरवागार निसर्ग मनांत साठवून कोऱ्या कागदावर अलगद जसाच्या तसा उतरविला आहे. त्यांच्या कविता निसर्गाचे आणि निसर्ग प्रेमाचे गाणे आहे. प्रेमांकुर कवितासंग्रह म्हणजे मोगऱ्याची सुगंधी फुले एकत्र करून केलेला एक सुंदर गजरा आहे. त्याचा सुगंध साहित्य विश्वात दरवळल्याशिवाय राहणार नाही.
प्रमुख पाहुण्या साधना जोशी यांनी अतिशय अभ्यासपूर्ण असे डॉ.पुष्पांजली यांच्या कवितांचे रसग्रहणात्मक वर्णन करून श्रोत्यांची दाद मिळवली. कवयित्रीच्या ‘इंद्रधनुष्य’ या काव्य कल्पनेशी अतिशय मार्मिक विवेचन करून प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. यशवंत देव उद्धृत करताना “किती गं तुझे रंग, किती गं तुझ्या छाया,दोनच माझे डोळे, उत्सव जातो वाया.” डोळ्यात साठवतो म्हटलं तरी सर्व साठवण्यास मर्यादा पडतात असे कवयित्रीचे कौतुक केले.
वेदांतश्रीचे प्रकाशक उंब्रजकर यांनी हा काव्यसंग्रह आपले 226 वे पुस्तक असून त्यांच्या छपाईस पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असे प्रतिपादिले. डॉ.सौ.पुष्पांजली कुंभार या स्वतः उच्च शिक्षित आहेत. एम.ए.,एम.एड., पीएच.डी.( शिक्षण शास्त्र) अशा पदव्या संसाराचा गाडा चालवताना संपादन केल्या. त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले. दोन्ही मुलींच्या (अनुराधा व श्रध्दा ) उज्वल भविष्याकरिता आपल्या करिअरचा त्याग करून एकीला कायद्यातील तज्ञ तर दुसरीला इंटरअॅक्टीव्ह डिझाईन मध्ये पदव्युत्तर स्नातक बनविले. दोघीही परदेशात स्थायिक होत आहेत. डॉ.पुष्पांजली यांनी आपल्या अनेक कविता मागील पार्श्वभूमी सांगून हा काव्यसंग्रह कसा शेवटी प्रेमाकडे वळतो याचे खुमासदार विश्लेषण केले आहे.
माधवी सूर्यवंशी यांनी स्वागतगीत म्हटले तर निर्मला भागवत यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमात प्रकाशन होवू घातलेल्या ‘प्रेमांकुर’ काव्यसंग्रहाची पुष्पवृष्टी करून दिंडी काढली. मोठ्या प्रमाणात- सुमारे 75 टक्के महिलावर्ग उपस्थित होता. विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध उद्योगपती नितीन भागवत, महाराष्ट्ररस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस के सुरवसे व त्यांच्या पत्नी, सपत्नीक पोलिस अधिकारी गंगाधर देवडे,कवि विलास कुंभार,निवेदक नारायण एखतपूरकर, अशोक महाराज गोरे, सपत्नीक डॅा.राजाळे, साहित्यिका अनुसया कुंभार,बिल्डर हर्षद ठुमर व पत्नी रेखा, भारती शिंदे, इंदू वार्ष्ण्येय यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली .
कवयित्रीचे पती डॉ. ए.टी.कुंभार ( निवृत्त आय.ए.एस. ) यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.



