– दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल; डोक्याला गंभीर दुखापत
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- बी.टी.बी. मार्केट परिसरातील शिवा धनीया दुकानासमोर टमाट्याचे कॅरेट उचलण्यावरून झालेल्या वादातून एका ४४ वर्षीय कामगाराला दोन तरुणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत कामगाराचे डोके गाडीच्या लोखंडी दांड्यावर आदळल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या कानातून व डोक्यातून रक्तस्त्राव झाला आहे. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
विकास हेमचंड पांडे (वय ४४, रा. हनुमान वार्ड, भंडारा) असे जखमी फिर्यादीचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास विकास पांडे हे मौजा बी.टी.बी. मार्केटमधील शिवा धनीया दुकानासमोर आपले काम करीत होते. यावेळी आरोपी रोहित मंदुरकर (२४) व राकेश मंदुरकर (२८, दोन्ही रा. गौतम बुद्ध वार्ड) तिथे आले. त्यांनी विकास पांडे यांना टमाट्याचे कॅरेट उचलण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली आणि आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर, विकास पांडे हे पिकअप गाडीतून वाटाणे खाली करत असताना दोन्ही आरोपी धावत आले आणि त्यांनी फिर्यादीला हाता-बुक्क्यांनी डोक्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत विकास यांचे डोके पिकअप गाडीच्या लोखंडी दांड्यावर जोरात आदळले. यात त्यांच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत होऊन रक्त वाहू लागले. मारहाण केल्यानंतर आरोपींनी पुन्हा शिवीगाळ करत तिथून पळ काढला.
या घटनेबाबत विकास पांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भंडारा पोलीस ठाण्यात आरोपी रोहित मंदुरकर आणि राकेश मंदुरकर यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक ९६/२०२६, कलम ११८(१), ११५(२), ३५१(२) आणि ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडगे हे करीत आहेत. भरबाजारात घडलेल्या या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.



