हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय, लाखनी येथे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन सेमिनाराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. रंजू पाल यांनी विद्यार्थ्यांना ‘फार्माकोलॉजिकल करिअर’ आणि ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. पाल यांनी आपल्या मार्गदर्शनात फार्मसी क्षेत्रातील विविध संधी, संशोधन आणि औषधनिर्मिती उद्योगातील करिअरच्या वाटा सविस्तरपणे मांडल्या. केवळ पदवी पुरेशी नसून स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि शिस्तबद्ध जीवनशैली असणे आवश्यक असल्याचे त्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाच्या माध्यमातून स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गणेश एम. कापसे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना फार्माकोलॉजी क्षेत्रातील आवश्यक शिक्षण, कौशल्ये आणि भविष्यातील जागतिक संधींबाबत मोलाची माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मार्गदर्शकांनी समाधानकारक उत्तरे दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत स्पष्ट दिशा आणि नवी प्रेरणा मिळाली आहे. कार्यक्रमाचे नेटके संचालन प्रा. सिंगांजुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुधीर सहारे यांनी मानले. या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद आणि आयोजक समितीने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे हा सेमिनार यशस्वी ठरला.



