spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

BTB मार्केटमध्ये ‘गब्बर टॅक्स’वरून राडा; संतप्त शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकला, लाखो रुपयांचे नुकसान

-“शेतकरी-कंत्राटदार संघर्षात पोलिसांची एन्ट्री; निलेश मोरे आणि उल्हास भुसारी यांच्या पुढाकाराने बीटीबी मार्केटमधील कोंडी फुटली”

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- भंडारा येथील बी.टी.बी. (BTB) भाजीपाला मार्केटमध्ये आज कर वसुलीवरून मोठा राडा झाला. नगर परिषदेने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून ‘टॅक्स’ आकारला जात असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी आपला शेकडो टन भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शेतकरी आणि कंत्राटदार यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा नगर परिषदेने मार्केटमधील कर वसुलीचे कंत्राट एका खासगी कंत्राटदाराला दिले आहे. आज पहाटे शेतकरी आपला माल घेऊन मार्केटमध्ये पोहोचले असता, कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी वसुली सुरू केली. यावेळी प्रत्येक बोऱ्यामागे २० रुपये आणि बॅगमागे ५ रुपये, तर प्रति टन २५० रुपये याप्रमाणे कर मागितला जात होता. या ‘गब्बर टॅक्स’ला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. कंत्राटदाराच्या माणसांनी माल आत नेण्यास मज्जाव केल्याने शेतकरी आक्रमक झाले.

भाजीपाला रस्त्यावर, शेतकऱ्यांचे अश्रू

तासनतास माल अडकून पडल्याने आणि कंत्राटदाराच्या अरेरावीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला थेट रस्त्यावर फेकून दिला. “आम्ही रात्रंदिवस कष्ट करून पीक वाढवतो आणि येथे पावतीच्या नावाखाली आमची लूट केली जात आहे,” असे मत उपस्थित कास्तकारांनी व्यक्त केले. या आंदोलनामुळे मार्केट परिसरात भाजीपाल्याचा खच पडला होता आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

शेतकरी, व्यापारी आणि कंत्राटदार यांच्यातील वादामुळे मार्केट परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेतली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी शेतकरी आणि व्यापारी यांच्याशी चर्चा करून मध्यस्थी केली. पोलिसांच्या आश्वासनानंतर आणि सामंजस्याच्या भूमिकेमुळे काही तासांनंतर हा वाद निवळला आणि वाहतूक सुरळीत झाली.

शेतकऱ्यांचा सवाल: ही लूट थांबणार कधी?

नगर परिषदेने कंत्राटदाराला नेमके किती वसुलीचे आदेश दिले आहेत? आणि कंत्राटदार मनमानी पद्धतीने वसुली करत असेल तर त्यावर कोणाचे नियंत्रण आहे? असे सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत. या ‘टॅक्स’ वादाने बी.टी.बी. मार्केट पुन्हा एकदा चर्चेत आले असून, प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.